ऑनलाईन दारू मागवायला गेला आणि 24 हजार रुपये गमावून बसला

19


सामना ऑनलाईन । मुंबई

काहीही खरेदी करण्यासाठी हल्ली सगळेच ऑनलाईन शॉपिंगची मदत घेतात. पण, एका प्राध्यापकाला ऑनलाईन दारू मागवणं चांगलच महागात पडलं असून चारशे रुपयांच्या दारूपायी त्याच्यावर 24 हजार रुपये गमावून बसण्याची पाळी आली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांत मासली (38) असं या प्राध्यापकाचं नाव असून ते माटुंगा येथील रामनारायण रुईया महाविद्यालयात जीवरसायनशास्त्र शिकवतात. गेल्या आठवड्यात प्रशांत यांना एका विशिष्ट ब्रँडची वाईन मागवायची होती. कामात व्यग्र असल्याने त्यांनी हे काम त्यांच्या विभागाचा शिपाई रुशाल राडे याच्याकडे दिलं. रुशालने ऑनलाईन सर्च केल्यानंतर त्याला बाबा वाईन शॉप नावाच्या एका दुकानाचा क्रमांक मिळाला. त्याने त्या क्रमांकाला फोन करत वाईनची ऑर्डर दिली. समोरच्या व्यक्तिने या ऑर्डरचं बिल 420 रुपये झाल्याचं सांगत त्याच्याकडून ऑनलाईन पेमेंटविषयी विचारणा केली. तेव्हा रुशालने प्रशांत यांच्याकडून त्यांचं क्रेडिट कार्ड मागितलं आणि त्याचे सर्व तपशील फोनवरील व्यक्तिला सांगितले. इतकंच नव्हे तर ओटीपीही दिला. या दरम्यान संपर्क तुटल्याने संबंधित दुकानदाराने पुन्हा एकदा रुशाल याच्याकडून तपशील आणि ओटीपी मागून घेतला.

यानंतर मात्र जे झालं ते चक्रावणारं होतं. कारण, त्यानंतर प्रशांत यांच्या खात्यातून पुढील तासाभरात तब्बल सहा वेळा व्यवहार झाले. पहिल्यांदा 420, नंतर तीन वेळा 4,420 आणि दोन वेळा पाच हजार रुपये असे एकूण 24 हजार रुपये त्यांच्या खात्यातून काढले गेले. त्यानंतर प्रशांत यांनी पुन्हा त्या क्रमांकावर फोन केला, तेव्हा तो फोन स्विच्ड ऑफ असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गेला काही काळ ऑनलाईन दारू खरेदी करतेवेळी पैसे गेल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे दाखल झाल्या आहेत. ऑनलाईन चोरांनी एक नवी क्लृप्ती शोधून काढली आहे. ऑनलाईन सर्च केल्यानंतर ज्या दुकानांचे क्रमांक दिसतात, त्या क्रमांकाऐवजी हे हॅकर वेगळेच क्रमांक सर्चमध्ये दाखवतात. त्यामुळे फोन खऱ्या दुकानदाराऐवजी हॅकरकडे जातो. दुकानाचं नाव आणि पत्ता योग्य दिलेला असतो. मात्र, फोन क्रमांक हॅकरचा दिला जातो. प्रशांत यांच्याबाबतीतही नेमका हाच प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या