विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचे सामूहीक रजा आंदोलन


सामना प्रतिनिधी । शिरूर अनंतपाळ

प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार ११ सप्टेंबर रोजी प्राध्यापकांच्या संघटनेच्या वतीने सामूहीक रजेचे आंदोलन करण्यात येणार आहे.

विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन (एम फूक्टो) तर्फे समान काम समान वेतन, ७५ हजार प्राध्यापकाच्या रिक्त जागा भरणे, जुनी पेंशन योजना लागू करणे, उच्च शिक्षणातील खाजगीकरण थांबवणे आदी मागण्यांसाठी मागील अनेक दिवसापासून आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून ११ सप्टेंबर रोजी एम फूक्टोच्या वतीने सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक महाविद्यालयीन शाखेला देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शिवनेरी महाविद्यालयातील स्वामुक्टाच्या वतीने संघटनेच्या सर्व प्राध्यापकांमार्फत प्राचार्यांना सामूहिक रजा दिल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.अभय बोंडगे व एम फूक्टोचे कार्यकारिणीची सदस्य प्रा. डॉ. मनोज सोमवंशी यांनी दै.सामनाला दिली.

राज्यातील कॉलेजमध्ये ४० टक्के पेक्षा जास्त प्राध्याकांच्या जागा रिक्त असून या जागा भरण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. सरकार दफ्तरी आजही १९९८ प्रमाणे २५ हजार प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत जी दीड लाख हवी होती. युजीसी ने उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी २० विद्यार्थ्यांमागे १ प्राध्यापक नेमण्याचे आदेश दिले आहेत. एकूण प्राध्यापकाच्या नऊ मागण्या असून या मागण्याच्या पाठपुराव्यासाठी सामूहिक रजेसाठी शिवनेरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एन. पवार यांना स्थानिक स्वामुक्टाच्या वतीने देण्यात आली.

यावेळी संघटनेचे सर्व प्राध्यापक, सी.एच.बी. प्राध्यापक उपस्थित होते.

राज्यात ७० हजाराच्या वर नेट सेट पीएच.डी धारक उमेदवार असून त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. त्यामुळे सरकारने भरतीची बंदी उठवून अशा तरुणांना संधी द्यावी व उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारावा, अशी प्रतिक्रिया स्वामुक्टाचे सदस्य प्रा.डॉ. अमोल लाटे यांनी दै.सामनाशी बोलताना दिली.