१२५ डेसिबल आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी


सामना ऑनलाईन | नाशिक

दिवाळी व इतर सणावेळी होणारे ध्वनी व हवा प्रदूषण रोखले जावे म्हणून जास्त आवाजाच्या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. फटाका उडविण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यंत १२५ डेसीबल आवाज करणाऱ्या फटाक्यांवर ६ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंदी राहील, असे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिले आहेत.

पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत नियम व सुधारित नियम ८९ अन्वये हा मनाई आदेश काढण्यात आला आह़े त्यानुसार गर्दीच्या ठिकाणांऐवजी मोकळ्या जागेत नागरिकांनी फटाके उडवावेत. साखळी फटाक्यांची आवाज मर्यादा चार मीटर अंतरापर्यंत ११५ डेसीबलपेक्षा जास्त नसावी. शांतता क्षेत्रात म्हणजे रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये इत्यादींच्या सभोवतालच्या शंभर मीटर क्षेत्रात, तसेच पेट्रोलपंप, केरोसिन, इत्यादी ज्वालाग्राही पदार्थाचा साठा व विक्री करणाऱ्या ठिकाणांपासून शंभर मीटर परिसरात, तसेच फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापराच्या जागेपासून ४ मीटर अंतरापर्यत फटाके उडवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर दररोज रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत फटाके फोडण्यास बंदी राहील. परवानाप्राप्त प्रत्येक स्टॉलमध्ये १०० किलो फटाके व ५०० किलो शोभेचे फटाके यापेक्षा जास्त साठा नसावा, आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात, परदेशी फटाके बाळगू नये किंवा त्यांची विक्री करू नये, दहा हजार फटाक्यांपेक्षा जास्त लांबीच्या फटाक्यांच्या माळेवरही बंदी राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.