परवडणाऱ्या घरांसाठी केंद्राचे भूखंड, मिठागरे खुली होणार!

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ लाख परवडणारी घरे बांधण्याची घोषणा केली आहे. यातील १० लाख घरे ही मुंबईत उभारली जाणार आहेत. मुंबईतील जागेची कमतरता पाहता आता केंद्र सरकारच्या अखत्यारितील मुंबई पोर्ट ट्रस्ट, संरक्षण खात्याचे भूखंड तसेच मिठागरांच्या जागेवर घरे उभारण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. या भूखंडांचे हस्तांतरण लवकरच केले जाणार असून सरकार यासाठीचा आराखडा केंद्राकडे पाठवणार आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे पश्चिम विभागीय परिषदेच्या स्थायी समितीची दहावी बैठक मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला गुजरात, गोवा, दीव-दमण, दादरा-नगर हवेली येथील तसेच केंद्रीय गृह मंत्रालय तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या मालकीच्या भूखंड तसेच मिठागरांच्या जागा परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी राज्य शासनाला हस्तांतरित करण्याबाबत चर्चा झाली. या भूखंडांच्या हस्तांतरणाबाबत राज्याच्या मुख्य सचिवांकडे बैठक घेऊन त्याचा बृहद् आराखडा महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे पाठवावा, असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यामुळे मुंबईतील मिठागारांच्या जागेवर सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प उभारणे सुलभ होणार आहे.

मुंबईत मिठागारांची ५३७९ एकर जागा

मुंबईत ५३७९ एकर इतकी मिठागारांची जागा आहे. या जागेवर घरे बांधता येतील का याची पाहणी एमएमआरडीएने केली आहे. या जागेवर घरे उपलब्ध करण्यासाठी सीआरझेड कायद्यातही सुधारणा केली जाणार असून अधिकाधिक जमीन घरांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबईत दहिसर, गोरेगाव, मुलुंड, भांडुप, कांजूर, नाहूर, घाटकोपर, तुर्भे, मंडाले, चेंबूर, वडाळा आणि आणिक येथे मिठागाराच्या जागा आहेत. यातील ३१ ठिकाणी मीठ बनविले जाते तर चार ठिकाणी मीठाचे कारखाने आहेत.