समुद्री विमान कोसळून एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला दु:खद घटना घडली. रविवारी सायंकाळी ऑस्ट्रेलियातील सिडनी या शहरात समुद्री विमानाला अपघात झाला. हे विमान हॉक्सबरी नदीत कोसळले. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये इंग्लंडमधील कंपास कंपनीचे सीईओ रिचर्ड कजिन्स आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या विमानामध्ये कंपास कंपनीचे सीईओ रिचर्ड, त्यांची वाग्दत्त वधू आणि तीन मुले प्रवास करत होते. काही तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अपघातातील सर्वांचे मृतदेह सापडले आहेत. ‘कंपास कंपनीचे सर्व कर्मचारी कजिन्स कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेत’, असे कंपनीचे अध्यक्ष पॉल वॉल्स म्हणाले.