गायींसाठी अभयारण्य; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

गायींच्या संरक्षणासाठी आता केंद्र सरकार अभयारण्य बनवण्याचा विचार करत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ही माहिती दिली आहे. हिंदुस्थानात गाईवरून सुरू असलेल्या वादामुळे आणि हिंसाचारामुळे हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. १६ राज्यांमध्ये ही अभयारण्य सुरू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

आजतक या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हंसराज अहीर यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की या अभयारण्यांमुळे गोहत्येचं प्रमाण लक्षणीयरित्या घटण्यास मदत होऊ शकेल. देशातील प्रत्येक जिल्ह्यात जर गायींसाठी निवारा तयार करण्यात आला तर गोहत्येवर पूर्णपणे बंदी घालता येईल असं अहीर यांचं म्हणणं आहे. हा प्रस्ताव घेऊन अहीर यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वंन मंत्री हर्षवर्धन यांची भेट घेतली.