देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा नवा १ कोटी ४९ लाख रुपयांचा प्रस्ताव लालफितीत

सामना प्रतिनिधी, संगमेश्वर

देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या खालावलेल्या कारभाराचा प्रश्न ऐरणीवर असतानाच रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी पाठविण्यात आलेला नवा १ कोटी ४९ लाख रुपयांचा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने देवरुख ग्रामीण रुग्णालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.

देवरुख ग्रामीण रुग्णालयाला सध्या विस्तारीकरणाची गरज आहे. या रुग्णालयाला ३० खाटांची मंजुरी असतानाही जागेअभावी केवळ २० रुग्णांचीच येथे सोय होते. अपुऱया जागेत सर्व विभाग सांभाळताना अधिकाऱयांसह कर्मचाऱयांचीही मोठी गैरसोय होते. याबाबत दोन वर्षांपूर्वी येथील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक प्रल्हाद देवकर यांनी ६४ लाखांचा प्रस्ताव पाठविला होता. दोन वर्षे तो तसाच पडून होता. यावर पुन्हा चर्चा करून नवा सुधारित प्रस्ताव आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

यामध्ये पूर्वीची इमारत पाडून त्याजागी जी प्लस वन स्वरूपाची नवी इमारत उभी करणे, यामध्ये प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष, लॅबोरेटरी, रक्तपेढी, शालेय आरोग्य तपासणी मोहिमेसाठी स्वतंत्र कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अद्ययावत यंत्रसामग्री, स्वतंत्र औषध विभाग आणि साठवण कक्ष, केसपेपर साठी स्वतंत्र विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अपघात विभाग, दहा बेडचा नवा प्रसूती कक्ष, क्ष किरण विभाग, आयुष, दंतचिकित्सा यासाठी स्वतंत्र कक्ष आदींचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रस्ताव १ कोटी २३ लाखांचा असून तो नव्या किमतीनुसार तयार करण्यात आला आहे.
याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात राहणाऱ्या केवळ काही कर्मचाऱ्यांनाच रुग्णालयाच्या आवारात राहण्याची सोय असून उर्वरित कर्मचाऱ्यांना भाडय़ाने राहावे लागत आहे. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी भोंदेशाळेजवळ असलेल्या जुन्या निवासस्थानांचे नूतनीकरण करण्यासाठी १७ लाखांचा तर रुग्णालयाशेजारी असलेल्या निवासस्थांनाची डागडुजी आणि नूतनीकरण करण्यासाठी नऊ लाखांचा असा एकूण २५ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

रुग्ण जागेअभावी ताटकळत
सद्यस्थितीत रुग्णालयाची अवस्था दयनीय असून रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांमुळे या रुग्णालयाचा भोंगळ कारभार चर्चेत आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांना तपासणीसाठी स्वतंत्र विभाग नसल्याने दिवसाकाठी येणाऱ्या शेकडो रुग्णांना जागेअभावी ताटकळत उभे राहावे लागते. औषध साठवणीची जागाही अपुरी असून केसपेपरसाठी कोंदट जागेत नंबर लावावा लागत आहे.