संभाजीनगरात शिवा संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

नागपूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथील विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. या घोषणेच्या निषेधार्थ अखिल भारतीय वीरशैव युवक (शिवा) संघटनेच्या वतीने शहरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.

सोलापूर येथील विद्यापीठास ‘शिवयोगी श्री. सिद्वेश्वर विद्यापीठ’ असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शिवा संघटनेच्या वतीने १८ सप्टेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तसेच अनेक वेळा मोर्चे, धरणे, रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. तसेच धनगर समाजाच्या वतीनेही मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथील कार्यक्रमात सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. या घोषणेचा तीव्र निषेध करून शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले.