मुख्यमंत्र्यांना पाकिस्तानी साखर, मोझांबिक तुरीचा  आहेर


सामना प्रतिनिधी । नगर

दूध व शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानची साखर, मोझांबिकची तूर, तर गुजरात, आंध्र व कर्नाटकच्या भेसळयुक्त दुधाचा आहेर आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, तर शेतकऱ्याच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे देशाचे कृषिमंत्री राधामोहन सिंग व अभिनेत्री रवीना टंडन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास भेसळयुक्त दूध पाजून निषेध करण्यात आला.

आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या प्रतिकात्मक अस्थिकलशाला अभिवादन करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. ‘शेतकरी वाचवा, आत्महत्या थांबवा’च्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून निघाला.

शेतमालाला उत्पादन खर्चाशी सुसंगत भाव मिळत नसल्याने शेतकरी तोटय़ात आला आहे. जोडधंदा असलेल्या दुधाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले असताना राज्यात सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र,सरकारने पाकिस्तानची साखर, तर मोझांबिक देशातून तूर आयात करून शेतकऱयांच्या जखमेवर मीठ चोळले. सरकारला देशातील तुरीला हमीभाव देता आला नाही. डेअरी व दूध संघवाले शेतकऱ्यांकडून कमी भावाने दूध घेऊन एका टँकरचे तीन भेसळयुक्त दुधाचे टँकर करून मालामाल होत आहे. गुजरात, आंध्र व कर्नाटकातील भेसळयुक्त दूध महाराष्ट्रात वितरीत करण्यास राज्य सरकार मदत करीत आहे. दुधाला भाव देण्याऐवजी दुधाची पावडर बनविणाऱया कारखान्यांना अनुदान देऊन शेतकरी संपविण्याचा घाट सत्ताधाऱयांचा असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला, तर पाकिस्तानची साखर व मोझांबिकची तूर परत पाठवून दूध व शेतमालाला योग्य हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली.