वर्ध्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांची घोषणाबाजी

सामना ऑनलाईन, नागपूर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्यामध्ये एका कार्यक्रमात भाषण करीत असतानाच शेतकऱ्यांनी लुटारू स्वयंसेवकांकडून आमचे कापसाचे पैसे मिळवून द्या या मागणीसाठी घोषणाबाजी केली. भाजप आणि संघाशी जवळीक असलेल्या सुनील टालाटुले नावाच्या कापूस व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कापूस खरेदीचे पैसे बुडवलेत. आमच्या शेतमालाचे हे हक्काचे पैसे असून सरकारने हस्तक्षेप करून तत्काळ ही रक्कम आम्हाला मिळवून द्यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली. त्यामुळे एकच खळबळ माजली. घोषणाबाजी करणाऱ्या २० ते २२ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कापसाचे पैसे बुडवणाऱ्या टालाटुले यांच्याशी चर्चा करून  हे प्रकरण लवकरच मिटवू, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले. शेतकऱ्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे सभास्थानी काही क्षण गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, पण नंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी भाषण पुन्हा सुरू केले आणि कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सुनील टालाटुले हा कापूस व्यापारी भाजप आणि संघाशी जवळीक असलेला स्थानिक नेता आहे. त्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून वर्ध्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसेच दिलेले नाही. त्यामुळे आंदोलकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्याच सभेत घोषणाबाजी केलीय. शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या या व्यापाऱ्याला भाजप सरकारच पाठीशी घालत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राला ‘स्वच्छता ही सेवा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी साताऱयाच्या प्रशांत पांडेकरला शॉर्ट फिल्मसाठी पुरस्कार देण्यात आला.