खड्ड्यांविरोधात अलिबागमध्ये सरकारचे ‘श्राद्ध’

सामना ऑनलाईन । अलिबाग

ग्रामीण भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे अलिबाग तालुक्यातील रहिवाशांना चालणेही मुश्कील झाले आहे. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसांत खड्डे भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र महिना उलटला तरी काम सुरू न केल्याने संतप्त रहिवाशांनी आज अखेर सरकारचेच ‘श्राद्ध’ घालून आपला संताप व्यक्त केला. एवढेच नव्हे तर लालफितीच्या कारभाराविरोधात ‘बो बो बो बो…’ अशी बोंब ठोकून सर्वपक्षीयांनी एकच ‘आवाज’ दिला. आमचे बळी जाण्याआधी तरी खड्डे भरा, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांचे तुम्हाला शाप लागतील, असा इशाराच देण्यात आला.

अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार तसेच अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे खड्डे तसेच आहेत. वाहनचालकांना या रस्त्यांवरून जाताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. सर्वपक्षीय संतप्त कार्यकर्त्यांनी आज सकाळी १० च्या सुमारास आरसीएफ येथील रस्त्यावर अभिनव ‘श्राद्ध’ आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते अॅड. जनार्दन पाटील, दिलीप जोग, गटनेत्या मानसी दळवी, शिवसेनेचे महेंद्र दळवी, अश्विनी कटक, विजय कवळे, विद्या पाटील, शैलेंद्र चव्हाण, अश्रफ घट्टे, धनंजय म्हात्रे, मनीष पाटील आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

… तर अधिकाऱ्यांना बांगड्या व साड्या भेट देणार!

अलिबाग तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे ‘श्राद्ध’ आंदोलनानंतरही सरकारला जाग आली नाही तर तृतीयपंथीयांना कार्यालयात आणून अधिकाऱ्यांना बांगड्या आणि साडीची भेट देऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला; तर खड्डे बुजविण्याचे काम लवकरात लवकर सुरू करू, असे आश्वासन बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते कांबळे यांनी दिले आहे.

– सरकारच्या विरोधातील या अनोख्या आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी मुंडण केले. यापूर्वीदेखील अलिबागमधील कार्यकर्त्यांनी भीक मांगो आंदोलन केले होते.
– चार महिन्यांपूर्वी नागाव येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पडून कारुळकर या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तरीही सरकारला जाग आली नाही.
– अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची स्थिती बिकट झाल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे रोजगारावरदेखील त्याचा परिणाम झाला आहे.