सोलापूरात माकपकडून पेट्रोल पंपांवर उग्र निदर्शने

सामना प्रतिनिधी । सोलापूर

देशव्यापी हिंदुस्थान बंदला पाठींबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने ज्येष्ठ कामगार नेते कॉ. नरसय्या अडाम (मास्तर) यांच्या मार्गदर्शनाखाली वाढती महागाई, पेट्रोल व डिझेलच्या अभूतपूर्व दरवाढी विरोधात पेट्रोल पंपावर आक्रमक निदर्शने करून सरकारचा निषेध केला.

सोलापूर मुख्यालय (ग्रामीण) पेट्रोलपंप या ठिकाणी अडाम मास्तर, माजी नगरसेविका नसीमाताई शेख, म. हनिफ सातखेड, फातिमा बेग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते निदर्शनात सहभागी झाले. तसेच अशोक चौक पोलीस चौकी येथील पेट्रोल पंपाजवळ माकपाचे जिल्हा सचिव एम. एच. शेख, माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख, तर सात रस्ता येथील पेट्रोल पंपाजवळ नगरसेविका कामिनिताई आडम, माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख, रंगप्पा मरेड्डी, अब्राहम कुमार, कुर्मय्या म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपावर जोरदार घोषणाबाजी करून सरकार विरुद्धचा आक्रोश व्यक्त केला.

या प्रसंगी सरकारचा निषेध करताना आडम मास्तर म्हणाले की, जागतिक पातळीवर कच्चा तेलाचे भाव कमी होत असताना हिंदुस्थानात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणे आश्चर्यकारक आहे. ज्यावेळी कच्चा तेलाचे भाव महाग होईल. त्यावेळी पेट्रोलचा दर वाढला पाहिजे. परंतु कच्चा तेलाचे भाव कमी होत असताना कुणाच्या खिशात पैसे भरण्यासाठी दरवाढ करत असल्याचा सवाल यावेळी केला.

मोदी सरकारने जनतेवर अभूतपूर्व आर्थिक भार टाकला आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या वेगाने होणाऱ्या भाववाढीचा कोट्यवधी हिंदुस्थानी जनतेच्या उपजीविकेवर विपरित परिणाम होत आहे. शेतकरी तर आधीपासूनच अरिष्टाने ग्रस्त आहेत, त्यांचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे. या भाववाढीचा एकूणच चलनवाढीवर परिणाम होतो आहे. यामुळे देशाची आर्थिक स्थिती खालावत आहे. नवीन रोजगार निर्मिती तर दूरच राहिली, आहे त्या नोकऱ्यांत घट होते आहे. हिंदुस्थानी रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीमुळे मोदी सरकारने निर्माण केलेले आर्थिक संकट सिद्ध झाले आहे. आधीच मोदी सरकारच्या धर्मांध-हुकुमशाही धोरणांमुळे त्रस्त असलेल्या जनतेवर हे आर्थिक आक्रमण होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

महागाई बद्दल सरकार बोलायला तयार नाही. आजही देशात कुपोषण, भूकबळी, उपासमार हे प्रश्न सुटलेले नाहीत. सर्वसामान्याच्या मजुरीत वाढ झालेली नाही. परंतु महागाई प्रचंड वाढलेली आहे. या महागाईमुळे लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या विषयी शासन गंभीर नाही, जर ही परिस्थिती अशीच असेल तर सरकार चालू देणार नाही, असा निर्धार या प्रसंगी व्यक्त केला.

शंकर म्हेत्रे, मुरलीधर सुंचू, बाबू कोकणे,नरसिंग म्हेत्रे, विल्यम ससाणे, दाउद शेख, नरेश दुगाणे, बापू साबळे, अकिल शेख, अशोक बल्ला, अनिल वासम, जावेद सगरी, हसन शेख, श्रीनिवास गड्डम, वसीम मुल्ला, अप्पाशा चांगले, वसीम देशमुख, रफिक काझी, मोहन कोक्कुल, दौला बागवान, विक्रम कलबुर्गी, किशोर मेहता आदींसह माकपचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.

आडम मास्तर यांच्यासह माकपच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांना तीन तासांनी सोडले.