नांदेडला बंदला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीमार

विजय जोशी । नांदेड

बुधवारी महाराष्ट्र बंदच्या पार्शभूमीवर नांदेडमध्ये देखील जागोजागी आंदोलने करण्यात आली. अनेक ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक व तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांवर देखील दगडफेक केली असून त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला.

बुधवारी दुपारी बारा वाजता गणेशनगर वाय पॉइंटजवळ पोलीस निरीक्षक नरवाडे हे गस्त घालीत असताना त्यांच्या गाडीवर अज्ञात समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात नरवाडे यांना किरकोळ मार लागला असला तरी गाडीतील पोलीस कर्मचारी गोविंद मुंढे, गणेश कानगुले, शिवाजी मुंढे व अन्य दोघांना जबर मार लागला आहे. या सर्वांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेचे वृत समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी गणेशनगर वाय पॉइंट भागात जावून प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव शांत होत नसल्याने शेवटी त्यांनी त्या भागात लाठीमार केला. सदरच्या भागात पूर्णतः शुकशुकाट असून, या परिसरात जमावबंदीचे आदेश पोलिसांनी जारी केले आहेत.

सकाळपासूनच नांदेडमधील सर्व व्यवहार ठप्प झाले असून, शाळा, महाविद्यालये, खासगी संस्था या सर्व बंद होत्या. बुधवारचा आज बाजार तोही आज तुरळकच गर्दी होती. हिमायतनगर येथे काही आदोलकांनी भाजीवाल्यांच्या भाज्याच रस्त्यावर फेकून दिल्या. त्यामुळे भाजीवाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे.