सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचा प्रश्न सुटणार; कंत्राटदार नेमणार

2

सामना ऑनलाईन । मुंबई

झोपडपट्टय़ांमधील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. तुटलेले दरवाजे, तुटलेल्या कडय़ा, फुटलेली शौचकुपे अशा अवस्थेत केवळ नाइलाज म्हणून रहिवाशांना शौचालयाचे तोंड बघावे लागते. या छोटय़ा-मोठय़ा दुरुस्तीसाठी यापुढे परिमंडळामध्ये कंत्राटदार नेमण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

शौचालयांच्या छोटय़ा-छोटय़ा दुरुस्त्या तातडीने करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे सर्व 24 विभागांतील सार्वजनिक शौचालयांच्या छोटय़ा दुरुस्तीकामांसाठी ठेकेदारांची परिमंडळनिहाय नेमणूक करण्यात येणार आहे. या ठेकेदारामार्फत संबंधित परिमंडळांमधील सार्वजनिक शौचालयातील छोटी दुरुस्ती कामे केली जातील. यामध्ये खराब झालेले भांडे बदलविणे, दरवाजांच्या खराब झालेल्या कडय़ा- बिजागऱ्या बदलणे, नळ दुरुस्ती, पाइप दुरुस्ती यासारख्या कामांचा समावेश असणार आहे. या कामांवर सहायक आयुक्तांची देखरेख असणार आहे. सार्वजनिक शौचालयांची कामे जागेअभावी रखडली आहेत. गेल्या दोन वर्षांत निश्चित केलेल्या एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी 40 टक्के शौचालय महापालिकेने अद्याप बांधलेली नाहीत. याचा मोठा फटका मुंबई हागणदारीमुक्त करण्याच्या मोहिमेला बसत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे.

 2417 शौचालये बांधण्याचे आव्हान

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत मुंबईत सार्वजनिक शौचालये बांधण्यात येत आहेत. त्यानुसार ऑक्टोबर 2016 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत पाच हजार 137 शौचालये बांधण्यात येणार होती. जुलै महिन्यात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील 934 शौचालयांपैकी 423 शौचालय धोकादायक असल्याचे उजेडात आले. ही शौचालये तत्काळ पाडण्याची गरज आहे. जागेची टंचाई आणि विविध अडचणींमुळे ही कामे रखडली आहेत. तरीही तीन महिन्यांत 2417 शौचालये बांधण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.