ठाणेकरांना एका ‘क्लिक’वर मिळणार शौचालय!

सामना ऑनलाईन । ठाणे

शौचालयाची माहिती जर गुगलवर मिळाली तर… हो आता हे शक्य होणार आहे. ठाणे महानगर पालिकेनं गुगलच्या मदतीनं ठाण्याला हगणदारीमुक्त करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ठाणेकरांना एका क्लिकवर जवळील शौचालयाची माहिती मिळणार आहे. त्यासाठी शहरातील ११ हजाराहून अधिक शौचालयांची माहिती गुगलवर उपलब्ध होणार आहे.

केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाण्यातील सर्व सार्वजनिक शौचालये गुगलवर दिसणार आहेत. ठाणे महापालिकांतर्गत येणाऱ्या ११ हजार २१७ सार्वजनिक शौचालयांना आता टॉयलेट लोकेटरद्वारे गुगलवर टाकले जाणार आहे. यासाठी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण खर्च केला जाणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालये गुगल मॅपद्वारे टॉयलेट लोकेटर बसवण्यासाठी ३ कोटी ४ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत ही सेवा सुरू होणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.