देशविदेश…मजेदार मेन्यू

मीना आंबेरकर

वर्षाचा शेवट नाताळच्या सणाने साजरा केला जातो. डिसेंबर महिन्यात येणारा नाताळ म्हणजेच सॅण्टाक्लॉज विविध तऱहेच्या भेटी घेऊन बच्चे लोकांच्या भेटीला येतो. त्यात मुलांबरोबर मोठेही आपली हौस भागवून घेतात. सर्वत्र आनंदाच्या उत्साहाचा माहोल असतो. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी असते.  वर्षाची अखेर व नवीन वर्षांची सुरुवात करताना नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी ठरविल्या जातात. त्यासाठी वेगवेगळय़ा पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. वेगवेगळय़ा ग्रुपच्या वेगवेगळय़ा पाटर्य़ा वेगवेगळय़ा वेळी ठरविल्या जातात. वेगवेगळय़ा वेळी म्हणजे कधी ब्रेकफास्ट पार्टी असते. कधी लंचसाठी माणसे एकत्र येतात. कधी इव्हिनिंग पार्टी असते तर कधी डिनर पार्टी असते. त्या त्या वेळचे वेगवेगळे मूडस असतात. त्या त्याप्रमाणे पार्टीसाठी खाद्यपदार्थ ठरवले जातात. ब्रेकफास्ट पार्टीचा मेनू वेगळा असतो. लंच पार्टीचा वेगळा असतो. इव्हिनिंग पार्टीला काहीतरी चटपटीत पदार्थ ठरवले जातात. डीनर पार्टी ही आणखी वेगळय़ा स्वरूपाची असत. एकंदरीत काय वेगवेगळय़ा वयोगटाच्या वेगवेगळय़ा पाटर्य़ा आणि त्यांचे वेगवेगळे मेन्यू असतात. त्यासाठी आपण काही पाककृती पाहणार आहोत. त्यामुळे पार्टीचे मेनू ठरविताना आपल्याला त्यांचा उपयोग होऊ शकतो.

bread-pudding

शाही ब्रेड पुडिंग

साहित्य…१ कप दूध, १/२ कप साखर, १ टी स्पून दालचिनी पावडर, १ कप क्रीम, ४-५ टी स्पून पिठीसाखर, ८-१० ब्रेड स्लाईस, २०-२५ बेदाणे, ५-६ खजूर, ४-५अक्रोड, ७-८ काजू-पिस्ता, १ मोठे सफरचंद, दिड कप खवा.

कृती…दूध, साखर एकत्र करून घ्यावे. ब्रेडला थोडे अमूल बटर लावून ते गरम करून घ्यावेत. एका पसरट भांडय़ाला तुपाचा हात लावून घ्यावा. वरील दुधात एक एक ब्रेड बुडवून भांडय़ात व्यवस्थित लावावेत. सफरचंद किसून त्यात खवा, पिठी साखर, खजुराचे, अक्रोडाचे तुकडे एकत्र करून ते मिश्रण व्हॅनिला इसेन्स घालून बेडवर पसरावे. पुन्हा उरलेल्या दुधात ब्रेड बुडवून तो ब्रेड मिश्रणावर घालावा. तयार केलेल्या क्रीममध्ये ३-४ चमचे पिठीसाखर घालून ते क्रीम बेडवर ओतावे. पिस्ते लावून सुशोभित करावे.

pototoe-rolls

पोटॅटो रोल्स

साहित्य – ४-५  उकडलेले बटाटे, मूठभर पुदिना, मूठभर कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, २ टी स्पून धणे, २ टी स्पून जिरे, २ टी स्पून तीळ, अर्धा चमचा आमचूर, अर्धा चमचा गरम मसाला, २ टी स्पून तूप, मीठ चवीनुसार, ३-४ टी स्पून कॉर्नफ्लॉवर, २०० ग्रॅम मैदा, ५० ग्रॅम तूप.

कृती…मैदा चाळून घेऊन त्यात तूप पातळ करून टाकावे. मीठ टाकावे. नंतर कणकेप्रमाणे घट्ट भिजवावे. धणे, जिरे, तीळ कच्चे वाटून घ्यावे. त्यात हिरव्या मिरच्या, पुदिना व कोशिंबीर बारीक वाटून घ्यावे. शक्यतो पाणी कॉर्नफ्लॉवर टाकून पेस्ट करावी. त्या पेस्टमध्ये आमचूर, गरम साला, मीठ, हिरवे वाटाणे टाकून चांगले फेसावे. त्या मिश्रणात उकडलेले बटाटे किसून टाकावेत. हे मिश्रण मैद्याच्या मिश्रणापेक्षा थोडे जास्त असावे. मैद्याची पोळी लाटून त्यावर ते मिश्रण पसरावे व त्याचा रोल करावा, तो रोल घट्ट असावा. सुरीने त्याचे काप करावेत, ते ताटात थोडे पसरून ठेवावे. अर्ध्या तासानंतर केव्हाही तळावेत.

kheema-pav

खिमा भूर्ता

साहित्य …अर्धा किलो खिमा, ५-६ कांदे, ३-४ टोमॅटो, २०-२५ पाकळय़ा लसूण, १ ते दीड इंच आले, अर्धा टी स्पून गरम मसाला, ३ टी स्पून लाल तिखट, २ टिस्पून धणा जिरा पावडर, अर्धा डबा स्वीट कॉर्न क्रीम किंवा अर्धी वाटी ओला वाटाणा, कोशिंबीर, मीठ, तेल.

कृती -लसूण पेस्ट करून त्यातील निम्मी खिम्याला लावून तो शिजवून घ्यावा. एका कढईत तेल टाकून त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकावा. कांदा थोडा परतल्यावर त्यात गरम मसाला, आलं – लसूण पेस्ट, लाल तिखट टाकून पुन्हा थोडे परतावे. नंतर टोमॅटोची साले काढून ते बारीक चिरून त्यावर टाकून परतावेत. मसाल्याला तेल सुटल्यावर खिम्याचे पाणी बाजूला काढून व मीठ टाकावे. १५-२० मिनिटे चांगले परतून घ्यावेत. खिमा कोरला व ब्राऊन करावा. नंतर त्यात धणा-जिरा पावडर, स्वीटकॉर्न क्रीम टाकून १० मिनिटे तो खिमा उकळू द्यावा. वरून कोशिंबीर टाकावी.