Pulwama Attack- दहशतवादी पोरांना आवरा, कश्मीरमधील मातांना लष्कराचे आवाहन

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

14 फेब्रुवारीला पुलवामा इथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर संरक्षण दलाने केलेल्या कारवाईबाबत माहिती देण्यासाठी मंगळवारी एक पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना चिनार कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल केजीएस धिल्लन यांनी कश्मीरमधील दगडफेक्यांना गंभीर इशारा दिला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये CRPF, हिंदुस्थानी लष्कर आणि जम्मू कश्मीर पोलिसांनी कश्मीर खोऱ्यातील मातांना आवाहन केलं आहे की दहशतवाद्याच्या मार्गावर गेलेल्या तुमच्या मुलांना परत बोलवा आणि समर्पण करायला सांगा. जर कोणी सैन्य दलाविरोधात बंदूक उचलली तर आम्ही त्याला सोडणार नाही असा खणखणीत इशारा फ्टनंट जनरल केजीएस धिल्लन यांनी दिला आहे. संरक्षण दलांनी दगडफेक्यांना इशारा देताना म्हटलंय की कोणताही नागरीक आमच्या कारवाईमध्ये जखमी होऊ नये असे आम्हाला वाटते मात्र जर कोणी चकमक सुरू असताना किंवा नंतर आले आणि गडबड करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना सोडणार नाही.

100 तासाच्या आत संरक्षण दलांनी जैश-एस-मोहम्मदच्या 3 टॉप कमांडरना कंठस्नान घालण्यात आले आहे. पुलवामा हल्ला हा पाकिस्तानी सैन्याचे पिल्लू असलेल्या जैश-ए-मोहम्मदने केला असून आयएसआयचा पण यामध्ये सहभाग असल्याचा दाट संशय CRPF, जम्मू कश्मीर पोलीस आणि हिंदुस्थानी लष्कराने व्यक्त केला आहे.