पुंडलिक पै

2

>>विकास काटदरे<<

डोंबिवली हे जसे मध्यमवर्गीयांचे शहर तसेच सांस्कृतिक आणि साहित्यिक केंद्र. या सर्व क्षेत्रांत धडपडणाऱ्या मंडळींची डोंबिवलीत कमतरता नाही. असेच एक व्यक्तिमत्त्व वाचनाची आवड जोपासण्यासाठी तीन दशकांपासून धडपड करीत आहे. पुंडलिक पै हे त्यांचे नाव. कर्नाटकातून डोंबिवलीत आलेल्या पुंडलिक पै यांनी तीन दशकांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर भागात पेंडसे लायब्ररी सुरू केली. आज त्यांच्या वाचनालयाच्या सहा शाखा व एक ऑनलाइन शाखा आहे. पै लायब्ररीची वाचक सभासदसंख्या सुमारे १० हजार असून त्यात सुमारे सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थी वाचक आहेत हे विशेष. या लायब्ररीत एकूण अडीच लाख मराठी, इंग्रजी पुस्तके आहेत. वाचनसंस्कृती वाढावी या एकाच ध्येयाने पुंडलिक पै यांना अक्षरशः झपाटले आहे. त्यासाठी त्यांचे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात. डोंबिवलीत एकेकाळी वाचनालयांचे पीक होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, मात्र आता हीच संख्या कमालीची रोडावली आहे. तरीही एक व्रत म्हणून पुंडलिक पै त्यांची वाचनाची आवड जोपासण्याचे काम एका निष्ठेने करीत आहेत. त्यासाठीच ते प्रत्येक वर्षी आगळावेगळा उपक्रम आयोजित करतात. मोठ्यांसाठी जसे ते उपक्रम घेतात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी यासाठी त्यांनी बाल विभाग सुरू केला आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. वाचकांना नियमित पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवडय़ातून सोमवारी अशी एकच सुट्टी ठेवली आहे. कोणत्याही सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वाचकांना पुस्तके बदलता यावीत हा त्यामागे उद्देश आहे. शाळाशाळांतून ते पुस्तक प्रदर्शने आयोजित करतात. याशिवाय आठवड्यातून दोन दिवस ‘पेंडसे कट्टा’ सुरू केला आहे. जागतिक पुस्तक दिनदेखील ते वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी एका दिवसात लायब्ररीचे १ हजार २१ सभासद करून जागतिक विक्रम केला होता. त्याची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आहे. आताच्या पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर पै काकांनी ९ एप्रिलपासून टिळकनगर शाळेच्या प्रांगणात ‘पुस्तके आदानप्रदान’ उपक्रम आयोजित केला आहे. परदेशात असे उपक्रम होत असले तरी आपल्या देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. वाचकांनी आपली वाचलेली १० पुस्तके द्यायची व तेवढीच पुस्तके घेऊन जायची असा हा उपक्रम आहे. नवी पुस्तके वाचण्यास मिळावीत हा त्यामागचा उद्देश आहे. मुख्य म्हणजे डोंबिवलीकरांनी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सुमारे ३५ हजार पुस्तके आतापर्यंत ‘आदानप्रदान’ झाली आहेत. शिवाय रोज शेकडो वाचक या ठिकाणी भेट देऊन पुस्तके बदलत वा विकत घेत आहेत. वाचनसंस्कृतीचा प्रसार व प्रचार करणारा एक निष्ठावान शिलेदार म्हणून पुंडलिक पै यांचे कार्य सुरूच आहे.