भाजपचा मुखवटा गळाला, खरा चेहरा उजेडात

सामना प्रतिनिधी । पिंपरी

आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणाऱ्या विठ्ठल – रुक्मिणी मूर्तींच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा कांगावा करणाऱ्या भाजपचा मुखवटा अखेर गळून पडला आहे. या खरेदीत घोटाळा झाला नसल्याचा निष्कर्ष महापालिका आयुक्तांनी काढला आहे. भाजपने भ्रष्टाचारवीर ठरविलेले सहआयुक्त दिलीप गावडे यांना दोषमुक्त करीत सक्त समज दिली आहे, तर भांडार अधिकारी सुरेश लांडगे यांना ५०० रुपये दंड ठोठाविला आहे. एवढेच नव्हे तर त्यांची खातेनिहाय चौकशी रद्द करत ‘फाइल क्लोज’ केली आहे. भाजपच्या सत्ताकाळातच दोन्ही अधिकाऱ्यांना क्लिन चिट मिळाल्याने भाजपच्या बोलभांड नेत्यांचे चेहरे काळवंडले आहेत.

आषाढी पालखी सोहळ्यात दिंडीप्रमुखांना २०१६ मध्ये विठ्ठल – रुक्मिणी मूर्तीभेट देण्यात आली. या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला. राज्यातील भाजप नेत्यांच्या दबावाखातर तत्कालीन आयुक्तांनी या कथित प्रकरणात प्राथमिक चौकशीसाठी द्विसदस्यीय चौकशी समिती गठीत केली. या समितीच्या अहवालानुसार आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप फेटाळण्यात आले, तर प्रभावी नियंत्रणाअभावी झालेल्या अनियमिततेस सहआयुक्त दिलीप गावडे आणि भांडार अधिकारी सुरेश लांडगे हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार गावडे आणि लांडगे यांची ११ नोव्हेंबर २०१६ रोजी खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली.

गावडे यांच्या खुलाशांवर निविदा छाननीत पर्यवेक्षकीय त्रुटी असून, ई-निविदांच्या प्राप्त दरपत्रकांच्या छाननीमध्ये त्रुटी राहिल्याचे दिसते, तर लांडगे यांनी केलेल्या खुलाशातील स्वतंत्र व्यावसायिक व उत्पादक असल्याची खात्री केल्याच्या बाबींशी विभागप्रमुखांनी असहमती दर्शविली.

हे अभिप्राय विचारात घेऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गावडे यांच्याविरोधातील चौकशी रद्द केली आहे. मात्र, गावडे यांनी कर्मचाऱ्यांकडून योग्य कामकाज करून घेण्याची जबाबदारी पार पाडली नाही. त्यांच्या कामकाजातील त्रुटींमुळे मूर्ती खरेदी निविदा प्रक्रियेत अनियमितता होऊन तरतुदींचे उल्लंघन झाल्याने त्यांना समज देण्यात आली आहे.
भांडार अधिकारी लांडगे यांची झालेली प्रदीर्घ सेवा आणि त्यांची लवकरच होणारी सेवानिवृत्ती विचारात घेऊन त्यांच्यावरील खातेनिहाय चौकशीही आयुक्तांनी रद्द केली आहे. मात्र, लांडगे यांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणामुळे मूर्ती खरेदी निविदा प्रक्रियेत अनियमितता झाली.

महापालिका अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याने लांडगे यांच्या नजीकच्या मासिक वेतनातून दंडात्मक कारवाईपोटी ५०० रुपये वसूल करण्याचा आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहे. यापुढे या दोन्ही अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना सचोटी व कर्तव्यपालनात कसूर केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश २७ डिसेंबर २०१७ रोजी जारी केला आहे.

बाऽऽऽ विठ्ठल अखेर पावला…
सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या कार्यकाळात विठ्ठल – रुक्मिणी मूर्तींची खरेदी झाली. २५ लाखांच्या या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा साक्षात्कार भाजपच्या चांडाळ चौकडीला झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भावनात्मक मुद्दा करीत राष्ट्रवादीच्या माथ्यावर खापर फोडण्यात आले. दिलीप गावडे, भांडार अधिकारी लांडगे यांना खलनायक ठरवत आंदोलने झाली. या वर्षा-दीड वर्षाच्या काळात या अधिकाऱ्यांना मानहानीबरोबरच मानसिक पिडांना सामोरे जावे लागले. तथापि, विठ्ठलावर दृढ विश्वास ठेवल्याने दोन्ही अधिकारी आरोपांच्या चिखलफेकीतून तावून-सुलाखून बाहेर पडले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीच क्लिन चिट दिल्याने आता सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या अतिरिक्त आयुक्त होण्याचा आणि भांडार अधिकारी लांडगे यांचा सन्मानाने निवृत्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • BE FIKRE

    tumhi kaay kartaay sattet tyanchya barobar… donhi bajune vajan band karaa