गंभीर गुन्हे करणार्‍या आंतरजिल्हा टोळीवर ‘मोक्का’,  38वी मोक्का कारवाई

लूटमार, दरोडा, जबरी चोर्‍यांसारखे गंभीर गुन्हे करणार्‍या आंतरजिल्हा टोळीवर हडपसर पोलिसांकडून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

अमोल भास्कर शेलार (वय 25, रा. नेवासा फाटा, जि. नगर), स्वप्नील उर्फ भावड्या ईश्वर केंदळे (वय 29, रा. नेवासा, जि. नगर), अमर चिल्लू कांबळे (35), विजय रामकृष्ण देडगावकर (63) अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हडपसर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी आरोपी शेलार, केंदळे, कांबळे यांनी हिसकावून नेली होती. शेलार आणि साथीदारांनी पुणे, तसेच नगर जिल्ह्यात गुन्हे केले आहेत. पोलिसांनी तपास करुन शेलार, केंदळे, कांबळे यांना पकडले. चौकशीत त्यांनी चोरलेल्या दागिन्यांची विक्री सराफ व्यावसायिक देडगावकर यांना केल्याची माहिती मिळाली. या टोळीने जबरी चोरी, लूटमार, दरोडा असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले होते. त्यामुळे चोरट्यांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी तयार केला. हा प्रस्ताव परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत पुर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला. प्रस्तावाला शर्मा यांनी मान्यता दिली. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख पुढील तपास करत आहेत. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 38 वी कारवाई आहे.