भलत्यासलत्या लिंकवर क्लिक करण्याआधी ही बातमी वाचा, बँकेतले पैसे वाचवा

21

सामना ऑनलाईन। पुणे

ऑनलाईन चोरीचे प्रकार सध्या वाढले असून वेळीच सावधगिरी बाळगल्यास आपले पैसे सुरक्षित राहू शकतात. नुकतेच एका डॉक्टरला असा अनुभव आला आहे. बँक कर्मचारी असल्याचे सांगत दक्षिण मुंबईतील एका डॉक्टरच्या अकाउंटमधून 3 लाख रुपये उडवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी शनिवारी एका 28 वर्षीय तरुणाला पुण्यातून अटक केली आहे. बिपिन महतो असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षी त्याने डॉक्टरला 3 लाखांचा चुना लावला होता.

एका इंग्रजी वृत्तपत्रात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी संबंधित डॉक्टरला एक फोन आला होता. समोरच्या व्यक्तीने डॉक्टरला तो बँक कर्मचारी असल्याचे सांगत बँकेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची विनंती केली. तसेच त्याने डॉक्टरला त्याची खासगी माहितीही त्यात भरण्यास सांगितले. यास डॉक्टरने नकार दिला. पण समोरच्या व्यक्तीने डॉक्टरला फक्त तुमचा अकाउंट नंबर तरी सांगा अशी विनंती केली. यामुळे डॉक्टरने त्याला अकाउंट नंबर दिला. त्यानंतर डॉक्टरला एक मेसेज आला व त्यातील लिंकवर क्लिक करण्याच्या सूचना त्यात होत्या. त्यामुळे डॉक्टरने लगेचच त्यावर क्लिक केलं. पण पुढच्याच सेकंदाला त्याच्या खात्यातून 3 लाख रुपये काढले गेल्याचा मेसेज त्याला आला. यामुळे हादरलेल्या डॉक्टरने गावदेवी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने कोणाच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा झाली ते तपासले. त्यावेळी डॉक्टरच्या अकाउंटमध्ये. 2 लाख 90 हजार रुपये होते. पण लिंकवर क्लिक केल्यानंतर चार वेळा अकाउंटमधून पैसे काढण्यात आल्याचे समोर आले. यात पहिल्यांदाच 1 लाख रुपये दोन वेळा त्यानंतर पन्नास हजार दोन वेळा, त्यानंतर चाळीस हजार रुपये काढण्यात आल्याचे समोर आले.

दरम्यान, आरोपीने पुण्यातूनच ही लूट केल्याचे स्पष्ट झाले. तसेच पुण्यातील एका बँकेत त्याचे अकाउंट असल्याचेही समोरआले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या