VIDEO- भजन म्हणणारा कुत्रा पाहिलात का?


सामना ऑनलाईन । पुणे

सोशल साईटवर सध्या एका व्हिडीओने खळबळ उडवली आहे. हा व्हिडीओ कुठल्या अभिनेत्री व अभिनेत्याचा नसून भजन म्हणणाऱ्या कुत्र्याचा आहे. पुण्यातील एका महिलेने तिच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. येथील एका मंदिरात दर गुरुवारी न चुकता हा कुत्रा येतो आणि भजन मंडळीबरोबर अगदी ताना देत भजन म्हणतो असं या महिलेने म्हटलं आहे.

सुषमा दाते असे या महिलेचे नाव आहे. ‘माझ्या एका मित्राच्या कारखान्यात हा कुत्रा राहतो. दर गुरुवारी तो एका मंदिरात येतो आणि भजन-कीर्तनात सहभागी होतो. भजन संपल्यानंतर प्रसादाचा लाभ घेऊन तो कारखान्यात परततो, असे सुषमाने आपल्या टि्वटमध्ये सांगितलं आहे’. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर व लाईक केला आहे. भजन म्हणणाऱ्या या कुत्र्याला पाहण्यासाठी लोकं लांबून येऊ लागले आहेत. काहीजणांनी हा दैवी चमत्कार असल्याचे म्हटलं आहे. तर काहीजणांच्या मते हिंदू धर्मातील पुराणग्रंथात कुत्र्याच्या इमानदारीचे अनेक किस्से लिहण्यात आले आहेत. यामुळे यामागे दैवी शक्ती आहे.

दरम्यान, तज्ज्ञांच्या मते कुठल्याही संगीत किंवा ध्वनी लहरींकडे कुत्रा लवकर आकर्षित होतो. त्यामुळे कुत्र्याचे भजन म्हणणे हा काही दैवी चमत्कार नाही. सर्कस किंवा एखाद्या कार्यक्रमात कुत्रे अनेकदा गाण्यावर नाचताना दिसतात. तसेच कुत्रा गाणं गात असल्याचे अनेक व्हिडीओ यूट्यूबही पाहायला मिळतात. यामुळे याला चमत्कार म्हणता येणार नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.