जनता वसाहतीत घरामध्येच जलवाहिनी फुटल्याने पूरस्थिती

2

सामना प्रतिनिधी । पुणे

सहकार नगर, शिवदर्शन आणि पर्वती या भागांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जनता वसाहत येथील एका घरात फुटल्याने 8 ते 10 घरांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी शिरले. पाण्याच्या प्रवाहामुळे घरांतील वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले तर अनेक वस्तू पाण्यासोबत वाहून गेल्या. त्यामुळे नागरिकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून सहकार नगर, शिवदर्शन आणि पर्वती या भागांना पाणीपुरकठा करण्यासाठी जनता वसाहत येथील डोंगरावर पाण्याची टाकी बांधण्यात आली. या टाकीत जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी नेण्यासाठी 18 इंच व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी 40 ते 45 वर्षांपूर्वी भूमिगत स्वरूपात टाकण्यात आली असल्याने जलवाहिनीवर नागरिकांनी घरे बांधली आहेत. येथील संगीता काशीद यांच्या घरात गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक जलवाहिनी फुटली. त्यामुळे घरात झोपलेले लोक पाण्याच्या दाबामुळे दुसरीकडे फेकले गेले. त्याच वेळी घर आणि दुकानाच्या मधील भिंत पडल्याने घरातील लोकांना बाहेर पडता आले नाही.

संपूर्ण घरात आणि दुकानात पाणी शिरल्याने घरातील लहानमोठय़ा वस्तू आणि दुकानातील फर्निचरचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर पाण्याचा प्रवाह शेजारील 8 ते 10 घरांमध्ये शिरला. त्यामुळे याही घरांमधील वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पाण्याचा हा प्रवाह अर्धा तास सुरूच हेता.