नावे बघून ‘एग्लार’ परिषदेला परवानगी; पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची माहिती

सामना प्रतिनिधी । पुणे

३१ डिसेंबर रोजी शनिवार वाड्यावर एग्लार परिषदेला उपस्थित राहाणाऱ्या मान्यवरांची नावे बघून काही अटींसह आम्ही या कार्यक्रमाला मान्यता दिली होती. त्यामध्ये ‘कबीर कला मंचा’चा कार्यक्रम होणार होता याची माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती, असा दावा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केला आहे.

१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीला आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयूतील विद्यार्थी नेता उमर खालिद आणि एग्लार परिषदेचे आयोजक, कबीर कला मंचाचे कलाकार यांनी प्रक्षोभक वक्तव्ये केल्याने त्यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत रश्मी शुक्ला यांना पत्रकार परिषदेत विचरण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या, या परिषदेला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी यांची नावे बघून एग्लार परिषदेला परवानगी देण्यात आली होती.

शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेण्यासाठी महापालिकेकडून परवानगी मिळाली होती, त्यामुळे विश्रामबाग पोलिसांनीही कार्यक्रमाल काही अटींसह परवानगी दिली. या परिषदेमध्ये कबीर कला मंचाचा कार्यक्रम होणार आहे हे आम्हाला माहिती नव्हते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असेही शुक्ला यांनी सांगितले.