गरूडझेपसाठी मिशन परवाज

ब्रिजमोहन पाटील । पुणे

मुस्लीम समाजातील तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन, शिक्षण मिळावे, त्यातून नोकरीच्या संधी वाढाव्यात आणि गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पुणे पोलिसांनी ‘मिशन परवाज’ सुरू केले आहे. गरीब घरातील मुलांचे शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यातून गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका वाढत चालला आहे. योग्य प्रशिक्षणातून सकारात्मकता निर्माण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत.

तळागाळातील तरुणांना नोकरी, शिक्षणाची संधी देऊन त्यांचे आयुष्य घडविण्यासाठी पुणे पोलिसांकडून गेल्या तीन-चार महिन्यांपासून मंथन होत आहे. त्यातून ‘मिशन परवाज’ ही संकल्पना पुढे आली. ‘परवाज’ या उर्दू शब्दाचा अर्थ गरुडझेप असा होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने चुकीच्या मार्गाने वाहत जाणाऱ्यांना वेळीच रोखून या उपक्रमातून गरुडझेप घेण्याची संधी मिळणार आहे. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षभरात नोकरदार महिलांच्या सुरक्षितेसाठी ‘बडीकॉप’, शालेय आणि महाविद्यायीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी ‘पोलीस काका’ हा उपक्रम सुरू केला. यासाठी आयटी कंपन्या, शाळा, महाविद्यालयांमध्ये मेळावे घेऊन त्यांची गरज, महत्त्व पटवून देण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही उपक्रमांचा चांगलाच गाजावाजा झाला.

‘मिशन परवाज’ मुस्लीम तरुणांना डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे. काही वर्षांपूर्वी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी मुस्लीम तरुणांना पोलीस भरतीसाठी मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरू केला होता. मुंबईमध्येही ‘मिशन दोस्त’ नावाने असा उपक्रम सुरू आहे. त्याचा लाभ अनेकांनी घेतला. त्याच धर्तीवर आता संपूर्ण शहरात ‘मिशन परवाज’ सुरू करण्यात आले आहे. ‘मिशन परवाज’च्या माध्यमातून पोलीस भरती प्रशिक्षण, एमपीएससी, यूपीएससी, आयटीआय प्रशिक्षण यांसह इतर अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन करणार आहेत. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि त्यांच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमाची सुरुवात केली. खडक पोलिसांनी भवानी पेठ, रामोशी गेट, लोहियानगर भागात तरुणांचे मेळावे घेतले. त्यांना मिशन परवाज म्हणजे काय हे समजावून सांगितले. या मेळाव्यांमध्ये सुमारे ४०० तरुणांनी पोलिसांकडे नावनोंदणी केली आहे. त्यात जवळपास ५० तरुणी आहेत. पोलिसांकडून आणि संस्थांकडून मिळालेल्या प्रशिक्षणातून आतापर्यंत ९ जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ‘मिशन परवाज’चे महत्त्व आणि यश यातून अधोरेखित होत आहे.

‘मिशन परवाज’ उपक्रमामध्ये पूना कॉलेजचे समाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. गुलाब पठाण, टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचे सामाजिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विशाल जाधव, सिम्बायोसिसचे रियाज पिरजादे, चिंचवड येथील सिग्मा स्किल एक्सलन्स सेंटरचे संचालक शफी शेख आणि आयबीएम वंâपनीतील टेक्निकल लीडचे शफी पठाण यांच्याकडून तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. डॉ. पठाण, डॉ. जाधव हे समाजातील इतर घटनांमध्ये नोकरी मिळावी यासाठी प्रयत्नशील होतेच; पण आता ‘मिशन परवाज’मधून ते पोलिसांच्या माध्यमातून काम करणार आहेत.

पोलिसांकडून घेतल्या जाणाऱ्या मेळाव्यांमध्ये तरुणांचे शिक्षण? त्यांची आवड? हे पाहून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना एमपीएससी, यूपीएससी क्लासेससाठी मदत केली जाणार आहे. पोलीसभरती व्हायचे असेल तर एसआरपीएफच्या मैदानावर त्याला प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन त्यांना ‘आयटीआय’चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. सिग्मा स्किल एक्सलन्स सेंटर आणि आयबीएम टेक्निकल लीड या दोन संस्थांमध्ये ही संधी उपलब्ध होणार आहे. शासकीय ‘आयटीआय’मध्ये किमान १०वी, १२वीपर्यंत शिक्षण आणि दोन वर्षांचा कोर्स असतो. मात्र, एमआडीसीमधील काही कंपन्यांनी एकत्र येऊन या संस्था सुरू केल्या आहेत. त्यामुळे तेथे तरुणांना चार महिन्यांचे आयटीआय प्रशिक्षण देऊन लगेच कंपन्यांमध्ये नोकरी दिली जाते. त्यामुळे कमी शिक्षण असणाऱ्या तरुणांना चांगली नोकरी मिळविण्यासाठी हा फायदा होणार आहे. शनिवारी (दि. २३) गंज पेठेमध्ये ‘मिशन परवाज’चे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी उद्घाटन केले. पुण्यातील मुस्लीमबहुल भागातील १५ पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.

लोकसंख्येचा विचार करता, मुस्लीम समाजातील तरुणांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आणि गुन्हेगारीमध्ये जास्त आहे. त्यांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी ‘मिशन परवाज’ सुरू केले आहे. पोलीस ठाण्यांमध्ये तरुणांची संकलित होणारी माहिती, पोलिसांशी वाढता संपर्क यातून गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण कमी होईल. हा या मिशनचा मोठा फायदा पोलिसांना होणार आहे. अनेकदा पुण्यातून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याने तरुणांना गुप्तचर यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. अशी कारवाई झाली की समाजामध्ये मोठी अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारांपासूनही तरुणांना रोखता येणे शक्य आहे. पोलिसांनी मुस्लीम तरुणांच्या मदतीसाठी एक हात पुढे केला आहे. त्यांना आता समाजाकडून यास सकारात्मक प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. पोलिसांच्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली तरी, प्रत्यक्षात यूपीएससी, एमपीएससीच्या क्लासेसला रोज हजर राहून अभ्यास करणे, पोलीस भरती व्हायचे असेल तर रोज सकाळी लवकर उठून सरावाला जावे लागते, तर आयटीआय प्रशिक्षण घेणाऱ्यांना चार महिन्यांचा कोर्स मेहनतीने करून नोकरीही व्यवस्थित करावी लागेल, तर या मिशनचा फायदा होऊन ‘परवाज’ या शब्दाचा मराठीतील ‘गरुडझेप’ हा अर्थ सार्थ ठरेल.