भटक्या कुत्रीने वाचवले डॉक्टरचे प्राण

4

सामना ऑनलाईन। पुणे

दिवसेंदिवस माणसांमधील संवेदना गोठत असल्याच्या अनेक घटना आपण आजूबाजूला बघत असतो. पण पुण्यात मात्र बुधवारी एका भटक्या कुत्रीने डॉक्टरचे प्राण वाचवल्याचे समोर आले आहे. ब्राऊनी असे तिचे नाव असून तिने दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे आदिनाथ सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर रमेश संचेती यांचा जीव वाचला आहे.

संचेती यांच्या घरासमोरील रस्त्यावर अनेक भटकी कुत्री फिरत असतात. या कुत्र्यांमधील एका कुत्रीचा संचेती यांना लळा लागला होता. ते तिला रोज खायला देत असतं. त्यामुळे ती संचेतींना चांगलीच ओळखू लागली होती. त्यांनी तिचे नाव ब्राऊनी असे ठेवले होते. त्याचदरम्यान ब्राऊनी आजारी पडली. त्यावेळी संचेती यांनी तिची काळजी घेतली व तिच्यावर उपचार केले त्यामुळे ब्राऊनी बचावली होती. त्याघटनेनंतर संचेती ब्राऊनीची विशेष काळजी घेऊ लागले. ते तिला घरीही आणत. बुधवारीही ते ब्राऊनीला घरी घेऊन आले होते. त्यावेळी संचेती यांची पत्नी मुंबईला गेली होती. तर मुलगा बावधान आणि मुलगी अमेरिकेत होती. यामुळे संचेती एकटेच घरात होते. त्याचवेळी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व ते खाली कोसळले. हे पाहता ब्राऊनी मोठ्याने रडायला लागली. सुदैवाने दरवाजा उघडा असल्याने तिने संचेती यांचे शेजारी राहणारे मित्र शहा यांच्या घरी धाव घेतली. ती संचेती यांच्या घराकडे बघून रडत होती व काहीच खात नव्हती. यामुळे शहा यांना संशय आला व ते संचेती यांच्या घरात गेले. तेथील दृश्य बघून त्यांच्या पायाखलची जमीनच सरकली. कारण संचेती जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यानंतर शहा यांनी संचेती यांना रुग्णालयात नेले. योग्यवेळी उपचार सुरू झाल्याने संचेती यांचा जीवाचा धोका टळला. ब्राऊनीने दाखवलेल्या प्रसंगवधनामुळेच आपले प्राण वाचल्याचे संचेती यांनी म्हटले असून यापुढे ब्राऊनी आमच्यासोबतच राहणार असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या