पैशाच्या पावसाच्या आमिषाने महिलेला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न

2

सामना ऑनलाईन, ब्रिजमोहन पाटील

आमच्या महाराजांमध्ये येणारा आत्मा तुझा उपभोग घेताना पैशाचा पाऊस पडेल. यातील हवा तेवढा पैसा तू घेऊ शकतेस असे आमिष दाखवून एका विवाहीत महिलेला वेशाव्यवसायात ढकलण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिघांविरूद्ध अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रेमंड सॅम्युएल फ्रँकलिन (रा. नांदेड सिटी), शेख जहीर अब्बास (रा. चिंचवड) आणि रेश्मा रामदास पाडळे (रा. चराडे वस्ती, वडगाव धायरी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २३ वर्षीय महिलेने (रा. धनकवडी) यासंदर्भात फिर्याद दिली आहे.  या पिडीत महिलेच्या पतीचे इस्त्रीचे दुकान आहे. या महिलेच्या मैत्रिणीने नवले पुलाजळ एका महिन्यापूर्वी रेश्मा पाडळे हिच्याशी ओळखी करून दिली. त्यानंतर त्या संपर्कात होत्या. बुधवारी (दि.१ फेब्रुवारी) रेश्माने या पिडीत महिलेला फोन करून सहकारनगर पोलीस ठाण्याजवळ बोलावले. तिथे रेश्माने पिडीत महिलेची आणि रेमंड फ्रँकलिनची ओळख करून दिली. लोणावळा येथे एक महाराज आहेत, त्यांना अंगावर तिळ व गोंदण नसलेल्या सुंदर मुली पुण्यातून पाठवतो. त्यांच्यावर तो पैशाचा पाऊस पाडतो. तुमच्या ओळखीच्या मुली असतील तर त्यांची माहिती द्या, त्याबदल्यात २० लाख रूपये मिळतील, कालच एक मुलगी तिकडे पाठवली, त्याचे मला १० लाख रूपये मिळाले असे रेमंडने या पिडीत महिलेला सांगितले.

रेमंडसोबतच्या भेटीनंतर पिडीत महिलेचे वेगवेगळ्या पोजमधील फोटो काढून घेतले. दोन दिवसांनी रेमंडने पिडीत महिलेला फोन करून सारसबागेत बोलावले. तेथे शेख अब्बासची ओळख करून दिली. महाजारांकडे हिच्यासह पाच मुली पाठवायच्या आहेत. हे महाराज तुम्हाला एका खोलीत नेतील. त्यातील मुलगी निवडून तिला नग्नावस्थेत होम करायला बसवतात. त्यांच्या अंगात एक आत्मा प्रवेश करतो. हा आत्मा तुमच्यासोबत संभोग करेल, त्या काळात तिथे पैशाचा पाऊस पडेल, हा आत्मा निघून गेल्यानंतर तेथे पडलेले हवे तेवढे पैसे तू घेऊ शकतेस असे शेखने या महिलेला सांगितले. शेखने या पिडीत महिलेला यासाठी तयार आहेस का असं विचारलं, यावर या पिडीत महिलेने तयारी दर्शवली. सुदैवाने या पिडीत महिलेला दुसऱ्याच दिवशी एक समाजसेविका भेटली,पिडीत महिलेने तिला हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर या समाजसेविकेने तिला समजावलं की पैशाचा पाऊस वैगरे काहीही नसते, हे तुला फसवण्याचा प्रकार आहे. यामुळे सावध झालेल्या पिडीत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला