`पुन्हा भेट’ व्हावी त्या वाटेवर…

<< साहित्य कट्टा >>           << शिल्पा सुर्वे >>

एखाद्या वाचलेल्या पुस्तकावर वा पाहिलेल्या सिनेमावर चर्चा करावी, एखाद्या छंदाची माहिती घ्यावी, कोणाच्यातरी अभिनव प्रयोगांना दाद द्यावी असं वाटत असताना पुन्हा भेट सारखा उपक्रम आपल्या नजरेस पडतो. संवादाच्या जगात आणणाऱ्या या अभिनव उपक्रमाविषयी.

संवादातून पुन: पुन्हा भेटीची आस लावणारा एक लहानसा, अनौपचारिक स्वरूपातील उपक्रम गोरेगावात सुरू आहे. ‘पुन्हा भेट’ असे या उपक्रमाचे नाव आहे. आपला नोकरीधंदा सांभाळून स्वानंदासाठी वेगळा छंद जोपासणारी मंडळी खूप असतात. त्यांचे त्यांचे स्वतंत्र बेट असते.  त्या बेटावर ती मंडळी सुखी असतात. चार वर्षांपूर्वी अशा आयसोलेशन मोडवरून गोरेगावात राहणारी चार माणसं एकत्र आली. त्यामध्ये अशोक राजवाडे आणि रवी केसकर यांचा प्रमुख सहभाग होता. जमलेल्या मंडळींनी सुरुवातीला एखाद्या वाचलेल्या पुस्तकावर किंवा पाहिलेल्या सिनेमावर बोलायला सुरुवात केली. सर्वांना छान वाटले. संवाद खूप मस्त झाला. यापुढेही वेळात वेळ काढून भेटायचे ठरले. ‘पुन्हा भेट’ ठरली. यावेळी पहिला इराणी सिनेमा एकत्र बघण्याची योजना आखण्यात आली आणि ती तडीसही गेली. तिथून ‘पुन्हा भेट’ उपक्रमाला सुरुवात झाली. गेली चार वर्षे उपक्रम सुरू आहे. अगदी खूप नाही, भारंभर नाही, पण मोजके दहा ते बारा कार्यक्रम आतापर्यंत झाले असतील.

‘पुन्हा भेट’ कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी न होता, सदस्यांपैकी कुणाच्या एकाच्या घरी गोरेगावला होते. सामान्यतः हजर राहणाऱयांची संख्या ८ ते २० असते. हजर राहण्याबद्दल कोणताच आग्रह वा नियम नाही. त्यासाठी संस्थेची नोंदणी नाही की घटना नाही. कोणी अध्यक्ष नाही की कोणी सेक्रेटरी. प्रत्येक कार्यक्रमात एक पाहुणा असतो. हा पाहुणा त्याच्या कार्याचे प्रेझेंटेशन करतो.  त्यानंतर पाहुण्याशी संवादाचा कार्यक्रम होतो.  इथे कोणतीही भाषणबाजी होत नाही. प्रत्येकाला पर्सन टू पर्सन बोलता आले पाहिजे, हा कटाक्ष असतो. काही वर्गणी वगैरे काढली जात नाही. ज्याला वाटतं तसं स्वेच्छेने खर्च करतो. कार्यक्रमालाही स्वेच्छेने उपस्थित राहतात, बंधन नाही. पैसे जमलेच तर खर्च वजा करून जे काही उरते ते पाहुण्यांच्या हाती दिले जाते. महिन्याला एकतरी ‘भेट’ झाली पाहिजे, असा काही नियम नाही. जात, धर्म, पंथ यातल्या भेदांना ‘पुन्हा भेट’मध्ये थारा नाही.

गोरेगावातील नागरी निवारा वसाहतीत राहणारे रवी केसकर यांच्या घरी डिसेंबर महिन्यात ‘पुन्हा भेट’ कार्यक्रम झाला. पर्यावरण विषयक अभ्यासक आणि कचरा, मलमूत्र व्यवस्थापन तज्ञ. त्यांनी मलमूत्र व्यवस्थापनाचे शिक्षण नॉर्वे इथून घेतले आहे. नुकतेच प्राची पाठक यांनी मानसशास्त्र आणि समाजविज्ञान या विषयात सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळवले आहे. त्या तीन सत्रांमध्ये शनिवार आणि रविवार असे तब्बल दहा तास बोलल्या. पहिल्या सत्रात अब्बास कियारोस्तमी या इराणी दिग्दर्शकाचा आत्महत्या या विषयाशी संबंधित असलेला ‘टेस्ट ऑफ चेरी’ हा सिनेमा आणि त्याबद्दल चर्चा झाली. दुसऱ्या सत्रात वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करताना प्राची यांना जाणवलेली जिव्हाळ्याची नाती, त्यांची जडणघडण, त्या करत असलेले असंख्य प्रयोग हे ‘पुन्हा भेट’चे आकर्षण ठरले. त्यात अंगणात, घरात पक्षी यावेत म्हणून साध्याशा गोष्टींपासून तयार केलेली पक्ष्यांसाठीची घरटी आणि त्याबद्दलचे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले. कचरा व्यवस्थापनाचे वेगवेगळे प्रकार, त्यांचे शून्य कचरा घर, नॉर्वेत या विषयातले तज्ञ करीत असलेले प्रयोग, संडासाचे विविध मॉडेल्स, अमेरिकेतील काही राज्यांमध्ये केले जाणारे कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण शिक्षण, याबद्दल त्यांनी माहिती दिली. घरातल्या साध्या साध्या दुरुस्त्या, जुगाड, वस्तूंचा पुनर्वापर करून याबद्दल त्यांचे प्रयोग त्यांनी दाखवले. तिसऱ्या सत्रात ओरिगामीचे विविध मॉडेल्स दाखवून त्यांचा मानसशास्त्राच्या दृष्टीने कसा वापर करता येईल, याबद्दल ऊहापोह झाला. ज्येष्ठ नागरिकांसाठी ओरिगामी, असाही एक पैलू त्यात होता. सर्वांसाठी ही भेट अविस्मरणीय ठरली.

काही महिन्यांपूर्वी ‘पुन्हा भेट’चा असाच एक देखणा उपक्रम पार पडला. त्यामध्ये पुण्याचे डॉ. मोहन देशपांडे सहभागी झाले. जगातील संगीत क्षेत्रात सध्या काय चाललंय, यावर डॉ. देशपांडे यांनी विवेचन केले. त्यांनी जागतिक संगीताचे नमुने सादर केले. यामध्ये प्रामुख्याने लोकसंगीत होते. डॉ. देशपांडे चित्रकला, नाटय़, गाणी या माध्यमातून आरोग्य संवाद करतात. दुर्गम, ठामीण भागात कार्य करतात. तिथल्या कामाचे अनुभव त्यांनी सांगितले. फुलपाखरांच्या जगात मनमुक्त वावरणाऱया रेखा शहाणे असू दे किंवा आरे कॉलनीतील आदिवासी पाडय़ातील  शिक्षक चित्रकला भोईर आणि त्यांची कन्या असू देत..प्रत्येकाने ‘पुन्हा भेट’ ला उपस्थित राहून आपली कला शेअर केली आहे.

अनेकदा माणसे एका परिसरात राहून वेगवेगळ्या तऱ्हेचे चांगले काम करीत असतात. मात्र परस्परांना ओळखत नसतात. त्यांना संवादाच्या जगात आणणारा ‘पुन्हा भेट’सारखा उपक्रम नक्कीच सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. ‘पुन्हा भेट’ व्हावी ज्या वाटेवर जिथे संवाद झाले.