डीवायएसपी जाधव यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा

6

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेडमध्ये जुगारविरोधी कारवाईच्या वेळी एका तरूणाला मारहाण केल्याप्रकरणी कर्जत जामखेडचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप जाधव व दोन पोलीसांना तीन महिने साध्या कैदेची शिक्षा जामखेड न्यायालयाने सुनावली आहे. २००९ मध्ये निवडणूकीच्या काळात घडलेल्या या घटनेचा निकाल काल दि. २७ रोजी बुधवारी लागला.

नामदेव रघुनाथ राऊत रा. कडा, ता. आष्टी जि. बीड यांनी यासंबंधी फिर्याद दिली होती. यानुसार तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप जाधव ( सध्या पुणे येथे नियुक्त) पोलीस कर्मचारी सचिन मिरपगार व मुस्ताक पठाण यांना तीन महिने साधी कैद व प्रत्येकी पाचशे रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास एक महिना साधी शिक्षा देण्यात येईल असे निकालात म्हटले आहे. जामखेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. ए. एच. आय. हश्मी यांनी हा निकाल दिला आहे.

१८ डिसेंबर २००९ मध्ये नामदेव हे त्यांच्या मित्रांसोबत जामखेड येथे चंद्रकांत राळेभात यांच्या घरी गेले होते. तेव्हा तेथे डीवायएसपी जाधव व पोलीस आले व अचानक त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. नामदेव यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झालेली होती. ते जोरजोराने ओरडून सांगत होते. पंरतु त्यांचे काहीही ऐकून घेतले गेले नाही. त्यामुळे त्यांच्या पोटाला इजा झाली होती. नंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मारहाणीच्या विरोधात राऊत यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु फिर्याद दाखल करून घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी खासगी फिर्याद दाखल केली व दहा वर्षे अथक पाठपुरावा केला. अनेक वेळा त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. अनेकदा हाकलून दिले होते.

फिर्यादीच्या वतीने अॅड. बाळासाहेब कोल्हे, बीड; अॅड बापुराव अनारसे, अॅड कालिदास पवार यांनी काम पाहिले. संदीप जाधव हे सध्या पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या