नीरव मोदीविरोधात पीएनबीची हाँगकाँग कोर्टात धाव

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीविरोधात पंजाब नॅशनल बँक हाँगकाँगच्या न्यायालयात पोहोचली आहे. नीरव आणि त्याचा मामा मेहूल चोक्सीची संपत्ती आणि व्यवसाय असलेल्या सर्व देशांमध्ये न्यायालयीन कारवाई करणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. केंद्रीय कॅबिनेटने आर्थिक गैरव्यवहार करून देशातून पलायन करणाऱ्या घोटाळेबाजांना धडा शिकवण्याच्या दृष्टीने शनिवारी एक अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार ५०० कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांची जगातील अनेक देशांमध्ये संपत्ती आणि व्यवसाय असल्याची माहिती समोर येत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या व्यवसाय आणि संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी १३ देशांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. ईडीने या १३ देशांना ‘लेटर ऑफ रोगेटरी’ जारी केलं आहे. सिंगापूर, दक्षिण अफ्रीका, इंग्लंड, दुबई, बेल्जियम, अमेरिका, रूस, फ्रान्स, चीन आणि हाँग काँग हे देश सहभागी आहेत. या माहितीच्या आधारावर ईडी मोदी आणि चोक्सीच्या परकीय संपत्तीची माहिती मिळवणार आहे.

कर्ज बुडव्यांना चाप
बँकांकडून कर्ज घेऊन परदेशात पळून गेलेल्या आरोपींना आरोपींवर कारवाई करण्यासंबधीचा अध्यादेश केंद्र सरकारने मंजूर केला आहे. यामुळे अशा आरोपींची संपत्ती त्यांच्या प्रकरणाचा निकाल येण्याआधी जप्त करून विकण्याची तरतूद या कायद्यात आहे. १२ मार्चला हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. त्यामुळे घोटाळा करून परदेशात पळून गेलेल्या आरोपींवर कारवाईचा फास आणखी घट्ट आवळणार आहे. या अध्यादेशाअंतर्गत १०० कोटींपेक्षा जास्त घोटाळा करणाऱ्या आरोपींच्या विरोधात सरकार कारवाई करु शकेल.