पुरण… वरण… तळण…

175

>> मीना आंबेरकर

बैलपोळ्यानिमित्त तयार करण्यात येणाऱ्या काही पाककृती

पिठोरीच्या व्रताची श्रावणाची सांगता होते. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, सुखासाठी आई हे व्रत करते. मुलांसाठी आयुरारोग्य देवाकडे मागते. श्रावण अमावस्या ही पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर या दिवशी बैलपोळा हा सण शेतकरी करतात. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण. या दिवशी बैलांना नटवून सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्यासाठी घरात गोडाधोडाचे जेवण केले जाते. यात मुख्यत्वे पुरणपोळीचा समावेश असतो. त्यानुसार आजचे हे मसालेदार सदर त्या अनुषंगाने येणाऱया काही खाद्यकृती पाहणार आहे.

puranpoli-23

पुरणपोळी

साहित्य…1 किलो हरभरा डाळ, अर्धा किलो उत्तम पिवळा गूळ, पाव किलो साखर, अर्धा चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळाची पूड, थोडे केशर, 1 वाटी रवा, 1 वाटी कणिक, 2 वाटय़ा मैदा, 1 वाटी तेल, मीठ.

कृती…डाळीपेक्षा दुप्पट पाणी उकळत ठेवावे. डाळ निवडून धुऊन पाण्याला उकळी आली की त्यात घालावी. 1 चमचा तेल व अर्धा चमचा हळद घालावी. चांगली मऊ शिजली की चाळणीतून निथळावी. पाणी टाकून देऊ नये. चांगली निथळली की पुन्हा त्याच पातेल्यात घ्यावी. गूळ बारीक चिरून घालावा. साखर घालावी व पुरण शिजत ठेवावे. घट्ट झाले की खाली उतरावे. नंतर त्यात वेलची पूड, जायफळ पूड व केशर घालावे. पाव चमचा मीठ घालावे व ढवळावे. नंतर पुरणयंत्रातून काढा व परातीत थोडेसे पाणी वापरून रवा भिजवावा. नंतर त्यात मैदा व कणिक मिसळून पोळीसारखे पीठ भिजवावे. थोडय़ा वेळाने वाटीभर तेल त्यात मुरवावे. पिठाला तार येईल इतपत सैल करावे. नंतर सुपारीएवढा पिठाचा गोळा घ्यावा. त्यात दुप्पट पुरणाचा गोळा भरावा. तोंड बंद करावे. तांदळाच्या पिठीवर लाटावा. अर्धा लाटून झाल्यावर उलटून दुसरी बाजू लाटावी. होईल तितकी पातळ करावी. तवा चांगला तापवावा. नंतर विस्तव मंद करून त्यावर पोळी अलगद टाकावी. दोन्ही बाजूंनी लाल डाग पडेल अशी भाजावी. खाताना तुपाची व दुधाची वाटी बरोबर घ्यावी.

aluvadi-2

अळूवडी

साहित्य…अळूची मध्यम आकाराची 4 पाने, थालीपीठ भाजणी 1 वाटी, बेसन 1 चमचा, आले अर्धा चमचा किसून, 1 हिरवी मिरची, 1 चमचा खसखस भाजून, खोबरे कीस 1 चमचा भाजून, चिंचेचा कोळ 1 चमचा, गूळ किसून 1 चमचा, हळद, मीठ, तिखट चवीनुसार.

कृती…खसखस, खोबरे कीस, मिरची, आले बारीक वाटावे. ही गोळ व इतर सर्व पदार्थ पिठात कालवावे. भज्यासारखे पीठ तयार करावे. अळूची पाने लाटण्याने जराशी दाबावीत. एक पान ताटात पालथे घ्यावे. त्यावर पिठातील थोडेसे पीठ पातळ पसरावे. दुसरे पान त्यावर पालथे घालावे. खालच्या पानाच्या टोकाकडे वरच्या पानाचा देठ आला पाहिजे. त्यावरही पीठ पातळ पसरावे. नंतर तिसरे व चौथे पान मागच्याप्रमाणेच घालावे. प्रत्येक पानावर पीठ सारवावे. नंतर चारी बाजूंनी पाने थोडीशी आत घेऊन चौकोनी आकार करावा. त्यावरही थोडे पीठ पुसावे. नंतर त्याची गुंडाळी करावी. पातेल्यावर बसेल अशी चाळणी घ्यावी. त्यावर ही गुंडाळी ठेवावी. वर झाकण ठेवावे. अर्धा तास शिजू द्यावे. थंड झाल्यावर सुरीने पाव इंच जाडीच्या चकत्या कापाव्यात व लालसर तळून घ्याव्यात.

kadboli

कडबू

साहित्य…2 वाटय़ा हरभरा डाळ, 2 वाटय़ा गूळ, अर्धा चमचा मीठ, अर्धी वाटी खसखस, 1 वाटी किसून भाजलेले सुके खोबरे, वेलची पूड अर्धा चमचा, पुरण शिजवण्याकरिता 6 वाटय़ा पाणी. (कव्हरसाठी) 2 वाटय़ा कणिक, 1 चमचा बेसन, 4 चमचे कडकडीत तेलाचे मोहन, पाव चमचा मीठ, तळण्यासाठी तेल किंवा तूप.

कृती…प्रथम पुरण शिजवून घ्या. शिजलेली डाळ उपसून कट काढा. पुरण चांगले निथळले की, रवीने चांगले ठेचून घ्या. मीठ व गूळ घाला. पुरण उलथण्याने हलवून 2 चर द्या. भाजलेली खसखस व खोबरे घालून परत एक चर द्या. वेलची पूड घाला. कणकेत कडकडीत तेलाचे मोहन घालून पुरीच्या कणकेइतपत घट्ट कणिक भिजवा. पुरीप्रमाणे लाटून करंजीप्रमाणे भरा. पारी चांगली पातळ लाटा. त्यामुळे कडबू चांगला होतो. मुरड घाला किंवा कातण्याने काता. तळून घट्ट तुपाबरोबर खायला द्या.

 

आपली प्रतिक्रिया द्या