पाचोरा न. पा. तर्फे प्रत्येक कुटूंबाला मोफत शुद्ध पाण्याचे वाटप

1

सामना प्रतिनिधी । पाचोरा

शिवसेनेची सत्ता असलेल्या पाचोरा नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक घरी २० लिटर पाणी वाटप करण्यात येत आहे. फिल्टर झालेले शुध्द पाणी प्रत्येकाच्या घरी जावून दिले जात असल्याने नागरीकांना शिवसेना आमदार किशोर पाटील यांचे कौतुक केले आहे.

यावर्षी पावसाळा न झाल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. ऐन दिवाळीच्या सणात नागरिकांना पिण्यासाठी वनवन भटकंती करावी लागू नये यासाठी शिवसेना आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहील उपनगराध्यक्ष शरद पाटे पालीकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी तातडीची बैठक घेतली. शहरवासीयांना दि. ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक कुटुंबाला २० लिटर फिल्टरचे मोफत पाणी देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार दि. ५ ऑक्टोबर पासून प्रत्येक वार्डात २ वाहनांद्वारे प्रत्येक घरी मोफत २० लिटर शुद्ध पाणी वाटप करणे सुरू करण्यात आले आहे.

पाणी टंचाई असल्याने नागरिकांना पिण्याचा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा केटीवेर कोरडाठाक झाल्याने शहरवासीयांना २० ते २५ दिवसांपासून पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. शहर वासीयांसाठी दि. ५ रोजी गिरणा धरणातून २ हजार ५०० क्यूसेस पाणी सुटले आहे. मात्र हे पाणी केटीवेर पर्यंत पाणी पोचण्यासाठी ५ ते ६ दिवस लागणार असल्याने ऐन दिवाळीत पाणी टंचाईची समस्या भेडसावू नये यासाठी पालिकेने सर्व पक्षीय नगरसेवकांची बैठक आयोजित करून दिवाळीच्या सणात नागरीकांना पिण्यासाठी २० लिटर शुद्ध पाणी घरपोच देण्याची मंजुरी मिळवल्यानंतर आमदार किशोर पाटील, मुकुंद बिल्दीकर, नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, नगरसेवक वाल्मिक पाटील, सतिष चेडे, बापू हटकर, विकास पाटील, वासुदेव महाजन, अशोक मोरे, मनिष भोसले, रफिक बागवान, रहमान तडवी, धर्मेंद्र चौधरी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन १० तारखेपर्यंत मोफत पाणी देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे ५ तारखेपासूनच शहरात दररोज प्रत्येक प्रभागात २ वाहनांतर्फे २० लिटर प्रमाणे अंदाजित १६ ते १७ हजार लिटर पाण्याचे वाटप करणे सुरू झाले आहे.