लेख : परंपरा शतक महोत्सवाची!

>>पुरुषोत्तम कृ. आठलेकर<<

पूर्वापार  चालत आलेल्या रूढी, परंपरा जपत त्या आचरणात आणत आपली शंभरहून अधिक वर्षे हा उत्सव साजरा करणाऱ्या केशवजी नाईक चाळ, जगन्नाथ चाळ, कामत चाळ, जितेकर वाडी, गंगाराम खत्री वाडी, शास्त्राr हॉल आणि सोमण बिल्डिंग या चाळींनी, वाडय़ांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपला एक वेगळा लौकिक जपला, एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

संपूर्ण देशात गणेशोत्सव आनंदात, उत्साहात महाराष्ट्रात साजरा होत असतो. त्यातून मुंबई व पुणे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे तर गिरगाव ही मुंबईच्या संस्कृतीची राजधानी. लोकमान्य टिळकांनी 1893 साली सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे यंदाचे 125 वे वर्ष आणि आजही त्याच रूढी, प्रथेनुसार केशवजी नाईक चाळ, जगन्नाथ चाळ, कामत चाळ, जितेकर वाडी, गंगाराम खत्री वाडी, शास्त्राr  हॉल, सोमण बिल्डिंग या सर्वांनी आपल्या गणेशोत्सवाची शंभरी पार करत गिरगाव परिसराचा लौकिक वाढवला आहे. यातील बहुतांशी चाळी जीर्ण झाल्या असून त्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत तर काही ठिकाणी उंचच उंच टॉवर्स विकसित झाले आहेत. गिरगावातील चाळी आणि वाडय़ा म्हणजे एक कुटुंबच. सण, उत्सव साजरे करताना रूढी,  प्रथा, परंपरा जपत त्याचे संस्कार पुढील पिढीवर रुजवले म्हणूनच आज शंभर वर्षांनंतर तोच उत्साह, आनंद आपणास बघावयास मिळतो. त्यामुळेच येथील वास्तूंनी आपली ओळख निर्माण केली. चाळींतील सण, उत्सवाच्या माध्यमातून होणारे विविध कार्यक्रम, स्पर्धा, पटांगण किंवा मोकळी जागा म्हणजे एक मुक्त व्यासपीठच. दहा बाय बाराच्या खोलीत झालेले संस्कार, चाळींतून जपल्या गेलेल्या रूढी व परंपरा त्यामुळेच अनेक नामवंत, ज्येष्ठ, श्रेष्ठ हे पूर्वाश्रमीचे गिरगावकर होते असे अभिमानाने सांगणारे भरपूर आहेत. शेजारधर्म पाळावा, आपुलकी, प्रेम, वेळप्रसंगी मदत करणे याची शिकवणसुद्धा या वास्तूतून मिळत गेली तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून वाढणारा एकोपा, उत्सवाचे आयोजन, आर्थिक गणिते, वेळेचे नियोजन, कार्यक्रमाची रूपरेषा यासाठी अहोरात्र झटणारे कार्यकर्ते उत्सवाचे व्यवस्थापन, आदरातिथ्य या सर्वांना अलीकडच्या भाषेत (इव्हेंट मॅनेजमेंट) म्हणतात, पण त्यासाठी कोणाला ‘एमबीए’चे धडे नाही घ्यावे लागले. उत्कृष्ट टीमवर्कच्या सहकार्याने या शतकोत्सवाची परंपरा कायमच ऊर्जा व प्रेरणा देत आली आहे. आज अनेकजण लहान जागेतून उपनगरात राहावयास गेले आहेत, पण या उत्सवाच्या निमित्ताने ते आवर्जून आपली हजेरी लावतात. इतकेच नव्हे तर काही चाळी तर जुन्या रहिवाशांची दहा दिवस सोयसुद्धा करतात. हाच खरा शेजारधर्म. या शतकोत्सवी गणरायांचे आगमन, विसर्जन मिरवणूकसुद्धा प्रथेनुसारच. आजच्या बदलत्या काळानुसार, जीवनशैलीनुसार थोडय़ाफार प्रमाणात फेरबदल झाले असतील, परंतु पूर्वापार  चालत आलेल्या रूढी, परंपरा जपत त्या आचरणात आणत आपली शंभरहून अधिक वर्षे हा उत्सव साजरा करणाऱ्या केशवजी नाईक चाळ, जगन्नाथ चाळ, कामत चाळ, जितेकर वाडी, गंगाराम खत्री वाडी, शास्त्राr हॉल आणि सोमण बिल्डिंग या चाळींनी, वाडय़ांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपला एक वेगळा लौकिक जपला, एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.