पुरुषोत्तम भापकर यांच्या बदलीचे आदेश २४ तासात रद्द

सामना प्रतिनिधी । मुंबई

संभाजीनगर विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या बदलीचे आदेश मंत्रालयातून संभाजीनगरला पोचण्याआधीच त्यांच्या बदली रद्दचे आदेश निघाले आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या भापकर यांच्या बदलीने नाराज झाल्याने मुख्यमंत्र्यांना भापकर यांच्या बदलीचे आदेश रद्द करावे लागले असल्याची चर्चा सनदी अधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे.

शनिवारीच संभाजीनगरचे विभागीय आयुक्त भापकर यांची शिक्षण सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश सामान्य प्रशासन खात्याने काढले होते. मात्र भापकर यांच्या बदलीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे संतापल्या. त्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचल्याने आज सायंकाळी तातडीने भापकर यांची बदली रद्द करण्यात आल्याचे आदेश सामान्य प्रशासन खात्याला काढावे लागले.

मात्र भापकर यांची बदली रद्द करतांनाच मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देण्याची संधी सोडलेली नाही. पंकजा मुंडे यांची खाजगी सचिव सलेले मीराभाईंदर महापालिका आयुक्त नरेश गिते यांची आयुक्तपदावरुन आज तातडीने उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रवानगी करण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बी.जी. पवार आयुक्तपदी
मीराभाईंदर महापालिका आयुक्तपदी बी.जी.पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बी.जी.पवार ठाणे महापालिकेत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असतांना शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्यांवर १०० कोटींची माया जमा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही काळानंतर पवार यांची ठाणे महापालिकेतून बदली करण्यात आली होती. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पवारांना मीरा-भाईंदरच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आल्याने सनदी अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.