सात्त्विक गोड चेहरा

25


धनेश पाटील,[email protected]

पूर्वा गोखले. शांत,गोड चेहरा, चेहऱयातील सात्त्विकता, टवटवीतपणा हे तिचे खास वैशिष्टय़.

इतिहासाची वेगळी साक्ष देणाऱया ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत सईबाईची चोख भूमिका साकारणारी, तर ‘कुलवधू’ मालिकेतून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवलेली अन् ‘रिमझिम’, ‘थरार’, ‘भाग्यविधाता’ या मराठी, तर ‘कोई दिल में है’, ‘कहानी घर घर की’ या हिंदी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला आणि ‘स्माईल प्लीज’ या व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकातून रसिक मन जिंकलेला मोहक चेहरा म्हणजे पूर्वा गोखले. अभिनयसंपन्न गुणी कलाकार म्हणून ओळख असलेल्या या गोड चेहऱयाच्या अभिनेत्रीनं आपला वेगळा रसिक वर्ग तयार करण्यात यश मिळवलं आहे.

ठाण्यातल्या होली क्रॉस विद्यालयातून शालेय शिक्षण, तर मुंबईतल्या वझे-केळकर विद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेली पूर्वा खरं तर अभिनय क्षेत्रात पुढे करीअर करील असं कोणालाही वाटलं नव्हतं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीएचं शिक्षण पूर्ण करत असलेल्या पूर्वाला पुढे  इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच आपण पूर्ण केलेल्या शिक्षणाला धरूनच करीअर करायचं होतं. मात्र तिच्यात दडलेल्या कलेनं तिचा प्रवास वेगळ्या उंचीवर नेला. पूर्वाश्रमीच्या पूर्वा गुप्तेवर अभिनयाचे संस्कार होण्यात तिच्या आईचा मोठा वाटा असल्याचं ती सांगते. आईच्या आग्रहाखातर पूर्वाने शाळा-कॉलेजमध्ये असताना अभिनय केला होता. तसंच आंतरबँकांच्या स्पर्धा, विविध संस्थांनी आयोजित केलेल्या स्पर्धा, सीकेपी संस्थेच्या स्पर्धा या सगळ्या स्पर्धांत पूर्वा नियमित भाग घेत असे.

1999 साली झी मराठीवरील ‘रिमझिम’ या मालिकेतून तिचा अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा झाला. मालिकेला मिळालेल्या विशेष यशानंतर तिने छोटय़ा पडद्यावर एकापाठोपाठ एक अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय सादर करत आपला एक रसिक वर्गच तयार केला. सध्या सुरू असलेल्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत पूर्वाने सईबाईची भूमिका साकारली होती. ऐतिहासिक मालिकेत काम करण्याचा हा पूर्वाचा पहिलाच अनुभव असल्याचं ती सांगते. मात्र तिच्या कलाकृतीतून तिचा हा अभिनय किती सक्षम आहे हे तिने अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. पूर्वाने अभिनयाच्या जोरावर घराघरांत प्रवेश मिळवला असला तरीही तिला चेहरा मिळाला तो ‘कुलवधू’ या विशेष लोकप्रिय ठरलेल्या मालिकेमुळे. अनेक तगडय़ा कलाकारांनी समृद्ध असलेल्या या मालिकेत सुबोध भावे या ज्येष्ठ कलाकारासोबत तिने अभिनय केला होता. मराठी मालिकांची ही शृंखला सुरू असतानाच तिने हिंदी मालिकांतही अभिनय सादर करत आपलं वेगळं अस्तित्वच निर्माण केलं होतं. बालाजी प्रॉडक्शनच्या मालिकांतून पूर्वाला अभिनयाची वेगळी शिदोरी मिळाल्याचे ती सांगते. ‘कोई दिल में है’, ‘कहानी घर घर की’ या हिंदी मालिका तसेच ‘बुंदें’ या हिंदी अल्बममध्ये पूर्वा झळकली अन् तिच्या करीअरचा ग्राफ उंचच उंच गेला. मराठी आणि हिंदी मालिकांच्या जोडीने मधल्या काळात ‘स्माईल प्लीज’ या व्यावसायिक नाटकांतूनही तिने अभिनय सादर केला होता. मराठी रंगभूमी आणि छोटय़ा पडद्यावर अभिनयाचा दांडगा अनुभव पाठीशी असलेल्या पूर्वाने छोटय़ा पडद्यावरील टेलिफिल्ममध्येही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. नृत्यकलेसोबतच तिला ऍरोबिक्सचेही उत्तम ज्ञान असून महाविद्यालयीन काळात पूर्वाने काही काळ ऍरोबिक ट्रेनर म्हणून काम केलं होतं. गुणी अभिनेत्री म्हणून पूर्वा गोखलेचा चेहरा सर्वांनाच परिचयाचा असून ‘मन उधाण वाऱयाचे’ आणि ‘आराधना’ या मालिकांतून पूर्वा पुढे सतत रसिकांना भेटत राहिली.

अनेक मराठी आणि हिंदी मालिकांतून पूर्वा गोखलेचा एक वेगळा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे. याच गुणी अभिनेत्रीचं एक वेगळं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली. नवरात्रीचे नऊ रंग आणि कलावती यावर आधारित असलेल्या फोटोशूटसंबंधित पूर्वाशी बोलून आम्ही शूटचं सगळं नियोजन केलं. या शूटची गरज लक्षात घेऊन पांढऱया रंगाची साडी अन् त्यावरचा शृंगार लक्षात घेण्यात आला होता. पांढऱया रंगाची साडी, त्यावरील दागिने आणि त्याला अनुसरून मेकअप आणि हेअर हे सारं काही ठरलं आणि पूर्वाचे पारंपरिक वेशभूषेतले काही फोटो मी कॅमेराबद्ध केले, तर त्यानंतर याच पांढऱया रंगाला धरून पूर्वाचे वेस्टर्न आऊटफिटमध्ये काही फोटो टिपायचे असं आम्ही ठरवलं. पांढऱया फ्रेश रंगाच्या या वेस्टर्न आऊटफिटमध्ये ही मार्ंनग ग्लोरी चांगलीच खुलली आणि तिच्या चेहऱयावरचे हेच हसरे भाव कॅमेऱयात बंदिस्त करण्यात मला यश आलं. रॅमरंट लायटिंगच्या जोडीने ब्युटी लायटिंग या प्रकाराची प्रकाश योजना करून हे फोटोशूट पार पडलं होतं. कॉस्च्यूम डिझायनर, ज्वेलरी डिझायनर, फॅशन स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट आणि असिस्टंट अशा तब्बल 19 जणांचा ताफा या छायाचित्रणाच्या वेळी होता.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या