पुष्पा पागधरे

प्रशांत गौतम

पार्श्वगायन क्षेत्रात लक्षणीय योगदान असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पुष्पा पागधरे यांना स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अंकुश’ चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या त्यांनी गायलेल्या गाण्यास कमालीची लोकप्रियता लाभली होती. षण्मुखानंद सभागृहातील आयोजित एका कार्यक्रमात ‘अगं पोरी सांभाळ दर्याला तुफान आलंय’ या पुष्पा पागधरे यांनी गायलेल्या गाण्याला खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुकाची दाद दिली होती. पालघर जिह्यातील सातपाटी येथे जन्मलेल्या पागधरे यांनी लहानपणी वडील जनार्दन चामरे यांच्याकडून संगीत शिक्षणाचे धडे घेतले. तर गुरू आर. डी. बेंद्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. पुष्पाताईंच्या गळय़ातील जादूई स्वरांची जाणीव संगीतकार राम कदम यांना झाली. त्यांनी आपल्या ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या चित्रपटात त्यांना गाण्याची प्रथम संधी दिली. ‘राया मला पावसात नेऊ नका’, ‘राया मला जरतारी शालू आणा’, ‘आला पाऊस मातीच्या वाऱयात गं दे’, ‘अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलयं भारी’ अशी कितीतरी गाणी आजही रसिकांच्या ओठावर असतात. ‘राया मला पावसात नेऊ नका’ हे दादा कोंडके यांच्या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेले गाणे खरे तर लता मंगेशकर गाणार होत्या, पण ऐनवेळी ही संधी पुष्पाताईंना मिळाली. या गाण्याच्या ओळीत अनेक ताना असल्याने पुष्पाताई संभ्रमित होत्या. तेव्हा संगीतकार राम कदम यांनी त्यांना विश्वास दिला. दादा कोंडके यांनीही कौतुक केले. पुष्पाताईंनी अनेक हिंदी चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले. ‘खून का बदला’, ‘बिन माँ के बच्चे’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अंकुश’ या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी आजही रसिकांना आठवतात. त्यांच्या संगीत प्रवासात बाळ पळसुले, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, प्रभाकर पंडित, विठ्ठल शिंदे, राम-लक्ष्मण, विश्वनाथ मोरे, यशवंत देव असे अनेक ज्येष्ठ संगीतकार लाभले. पुष्पाताईंनी भोजपुरी उडिया, बंगाली, मारवाडी, हरियानवी, पंजाबी, गुजराती, आसामी अशा विविध भाषांत गायन केले. अर्थात एवढे योगदान संगीत क्षेत्रात असले तरी त्यांचा घराचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मात्र उशिरा का होईना लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या वाटचालीचा यथायोग्य गौरव झाला असेच म्हणावे लागेल.