बाळासाहेबांनी कौतुक केले तो क्षण सर्वोच्च-पुष्पा पागधरे

>>विजय जोशी, नांदेड

”मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. त्यावेळी बाळासाहेब मला म्हणाले, पुष्पा तू छान गातेस त्यांचे ते शब्द मी जपून ठेवले आहेत. त्यांनी माझे कौतुक केल्याचा तो क्षण माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे”, अशा शब्दात प्रख्यात गायिका पुष्पा पागधरे यांनी बाळासाहेबांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. आषाढी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवाकर चौधरी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘पुष्पातार्इंशी गप्पा गोष्टी’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

गप्पा गोष्टीच्या सुरुवातीला पुष्पातार्इंच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदक राजश्री पाटील आणि दिवाकर चौधरी यांनी पुष्पा पागधरे यांना बोलते केले. या कार्यक्रमात पुष्पा पागधरे यांनी प्रेक्षकांशी त्यांच्या आठवणी वाटून घेतल्या. आपल्या आठवणी सांगतांना पुष्पा तार्इंनी सरकारी अनास्थेवर कोरडे ओढणारी आपली खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या ”१९८९ पासून मी कलाकारांच्या कोट्यातून मुंबईत सरकारने मला घर द्यावे ही विनंती करीत आहे, पण आजतागायत मला घर मिळालेलं नाही.”

पुष्पातार्इंच्या या आठवणीने प्रेक्षकांनी सरकारच्या संवेदनशून्यतेचा मनोमन निषेध केला आणि विठ्ठलाने युती सरकारला तरी सुबुद्धी द्यावी व आयुष्यभर आपल्या संगीत सेवेने रसिकांना आनंद देणाऱ्या या गायिकेला तिच्या आयुष्याच्या संध्याकाळी निवारा द्यावा, अशी प्रार्थनाही केली.