सिंधूचे सुवर्णपदक हुकले, रौप्य पदकावर समाधान

सामना ऑनलाईन । ग्लासगो

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचे सुवर्णपदक हुकले आहे. अंतिम सामन्यांच्या सिंधूचा जपानच्या नोजोमी ओकुहाराने तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात २१-१९, २०-२२ आणि २२-२० असा पराभव केला. अंतिम सामन्यात पराभवामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारी सिंधू पहिली खेळाडू ठरली आहे. मात्र सुवर्णपदक हुकल्याने सिंधूच्या चेहऱ्यावर साफ निराशा दिसत होती.

ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या सिंधूने अंतिम सामन्यात पहिला सेट १९-२१ असा गमावला. पहिला सेट २५ मिनिटांचा झाला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. प्रत्येक गुण घेण्यासाठी दोन्ही खेळाडू जिवाचे रान करताना दिसत होते. दुसऱ्या सेटमध्ये सामना २०-२० असा बरोबरीत असताना सिंधूने सलग दोन गुण घेत सेट जिंकला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली.

तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये ओकुहाराने सुरुवातीला ५-१ अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने आक्रमक खेळ करत सेटमध्ये १३-१३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर १४-१४, १५-१५ अशी बरोबरी झाली. सामना जिंकण्यासाठी दोन्ही खेळाडू जोरदार प्रयत्न करत होते. १५-१५ बरोबरीनंतर सिंधूने २ गुण घेत १७-१५ आघाडी घेतली. मात्र त्यानंतर ओकुहाराने जबरदस्त खेळ करत सेट पुन्हा बरोबरीत आणला. दोन्ही खेळाडूं प्रत्येक गुण घेण्यासाठी संघर्ष करत होती. सेटमध्ये २०-२० अशी बरोबरी झाल्यानंतर ओकुहाराने सलग दोन गुण घेत तिसरा सेट आणि सामनाही जिंकल आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.

याआधी उपांत्यफेरीच्या सामन्यात ओकुहाराने हिंदुस्थानचा सायना नेहवालचा १२-२१, २१-१७ आणि २१-१० असा पराभव केला होता. त्यामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचे सायनाचे स्वप्न भंग पावले होते आणि तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.