सिंधूचे जपान ओपनचे अभियान आजपासून

सामना ऑनलाईन, टोकियो

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू उद्यापासून सुरू होणाऱ्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आपल्या अभियानास सुरुवात करणार आहे. या स्पर्धेत तरी सिंधूला अंतिम फेरीतील पराभवाची मालिका खंडित करता येईल काय याकडे तमाम हिंदुस्थानी चाहत्यांचे लक्ष असेल.

सिंधूला आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या हिंदुस्थानच्या या बॅडमिंटनपटूला प्रदीर्घ काळापासून फायनल जिंकता आलेली नाही. जपान ओपनमध्ये यजमान देशाच्याच सयाका ताकाहाशीविरुद्ध सिंधू आपल्या अभियानास सुरुवात करील. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत सिंधूची गाठ तीनवेळची जगज्जेती कॅरोलिना मारिन, अकाने यामागुची, तेई यिंग यांच्यापैकी एकीशी पडण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धेतील कास्य पदक विजेती सायना नेहवाल व बी. साई प्रणीत या हिंदुस्थानी खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. किदाम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणॉय हे जागतिक स्पर्धा व आशियाई स्पर्धेतील अपयश धुऊन काढण्याच्या इराद्याने जपान ओपनमध्ये सर्वस्व पणाला लावतील. पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी, मनू अत्री व बी. सुमित रेड्डी हे हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करतील.