कान्स महोत्सवाची राणी

 

कान्स महोत्सवातील ऐश्वर्याच्या राजेशाही पेहरावाच्या गोष्टी…

ऐश्वर्या राय बच्चन… ती नुसती ‘राय’ होती तेव्हा जशी होती तश्शीच आजही… तिच्या सौंदर्यात, फॅशनेबल राहण्यात काहीही फरक पडलेला नाही. याचा प्रत्यय प्रसारमाध्यमांनाही अनेकदा आलाय. बऱयाचवेळा कधी ती एखाद्या विशिष्ट प्रकारच्या लिपस्टिकमुळे तर कधी कान्स महोत्सवातील वेगवेगळ्या ड्रेसमुळे चर्चेत आली. येते आणि येत राहणार… हे वक्तव्य ऐश्वर्याच्या कुणा चाहत्याचे नाहीत. ते म्हटलंय कान्स चित्रपट महोत्सवात तिचे ड्रेस डिझायनिंग करणाऱया आस्था शर्मा यांनी.

आस्था शर्मा… फॅशन विश्वातलं एक गाजलेलं नाव. पर्ल अकॅडमीच्या या माजी विद्यार्थिनी. गेल्या तीन वर्षांपासून ऐश्वर्यासाठी ड्रेस डिझायनिंग करत आहेत.  ऐश्वर्याप्रमाणेच आस्था यांनी आतापर्यंत इशा गुप्ता, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, पूजा हेगडे, नेहा धुपिया, तबू, तमन्ना भाटिया, हंसिका मोटवानी, सपना पब्बी, उर्वशी रौतेला, जॅकलीन फर्नांडीस अशा कितीतरी सेलिब्रेटींसाठी ड्रेस डिझायनिंग केलंय.

कान्स फिल्म फेस्टीवलमध्ये इतक्या वर्षांत ऐश्वर्याचा ना ड्रेस सेन्स बदललाय, ना तिची आवडनिवड… गाऊन असो, वेस्टर्न आऊटफिटचा ड्रेस असो की हिंदुस्थानी पद्धतीची साडी… ऐश्वर्या प्रत्येक पेहरावात खुलून दिसते. ड्रेस डिझायनर आस्था शर्मा यांनी ऐश्वर्याच्या रंगसंगतीच्या जाणतेपणावर अचूक बोट ठेवलं. त्या म्हणतात, कान्स महोत्सवात ऐश्वर्या हवीच… तिला काळा रंगाचे कपडे घालायला खूप आवडतात. काळ्या रंगावर प्रेम करणारी ती एकटीच नाही. शाहरुख खानपासून करण जोहरपर्यंत बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींना काळा रंग भावतो. ऐश्वर्याचा फक्त काळा रंगच फेवरीट आहे असे नाही, तर तिला कुठलाही रंग आवडू शकतो. त्या त्या ड्रेसवर ते अवलंबून आहे. गेली तब्बल १५ वर्षे कान्स फिल्म फेस्टीवलला ऐश्वर्याला मानाचं निमंत्रण असतं. यंदा ती सोळाव्यांदा या महोत्सवात सहभागी झाली आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर ती चालायला लागते तेव्हा एखादी राजकुमारीच चालत असल्याचा भास होतो. म्हणूनच तिला ‘कान्स महोत्सवातली राणी’ म्हणणंच जात योग्य ठरेल, असंही आस्था शर्मा म्हणाल्या.

ऐश्वर्याबद्दलची एक आठवण आस्था शर्मा रंगवून सांगतात. त्या म्हणतात, मला आठवतंय, ऐश्वर्या हिच्याबरोबर मी नुकतंच काम सुरू केलं होतं. जवळपास आठवडाच झाला असेल. एका कार्यक्रमासाठी तिला शॉर्ट ड्रेस घालायचा होता. तो घालण्यासाठी तशी ती नाखुश होती. तिला ते योग्य वाटत नव्हतं. मग मी तिला समजावलं. ती या ड्रेसमध्ये किती चांगली दिसतेय हे तिला पटवून दिलं. त्यानंतर ऐश्वर्या अक्षरशः खुलली… लगेच बिनधास्तपणे तो ड्रेस घालून ती बाहेर पडली. त्यावेळी मिकी कॉन्ट्रक्टर यांनी तिचा मेकअप केला होता.

जगातील सर्वाधिक

फॅशनेबल स्त्री

ऐश्वर्याला फॅशनमध्ये प्रयोग करत राहायला आवडत नाही असंही आस्था शर्मा सांगतात. प्रयोग म्हणून आपण काही वेगळं तिला दाखवलं तर ती लगेच नर्व्हस होते. पण फॅशनच्या बाबतीत जे क्लासिक असेल, चांगलं असेल, मोहक असेल ते ती लगेच स्वीकारते. म्हणूनच तर जगातली सर्वात फॅशनेबल स्री असेल तर ती फक्त ऐश्वर्याच… तिच्याबद्दल तक्रार करत नाही, पण मला वाटतं तिच्या कलाने घेतलं तर ती कोणतीही फॅशन करायला तयार होते. फक्त ते तिला रुचलं पाहिजे.