रा. अ. कुंभोजकर

5

सध्याच्या पत्रकारितेचे मापदंड आणि स्वरूप प्रचंड बदललेले असले आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे अनेक गोष्टी तुलनेने खूप सोप्या झाल्या असल्या तरी पूर्वीच्या काळातील पत्रकारिता एवढी सोपी आणि सहज नव्हती. अनंत प्रकारच्या अडचणी आणि अडथळ्यांचा तो काळ होता. पत्रकारितेचे मापदंडही वेगळे होते. अशा कसोटीच्या काळात ज्या मान्यवरांनी पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटवला त्यात एक नाव रा. अ. कुंभोजकर यांचे निश्चितपणे घ्यावे लागेल.

सध्याच्या `मीडिया’ला उथळपणाचा खळखळाट जास्त असल्याचा आरोप नेहमीच होतो. खमंगपणा, `ब्रेकिंग न्यूज’ची स्पर्धा, त्यासाठी लागणारी सनसनाटी अशा अनेक मुद्द्यांवर अनुकूल-प्रतिकूल चर्चा हल्ली नेहमीच होत असते. रा. अ. कुंभोजकर हे मात्र व्यासंगी आणि अभ्यासू पत्रकारांच्या जुन्या पिढीचे प्रतिनिधी होते. भाषा आणि साहित्य यांची उत्तम जाण, त्याची मांडणी करण्यासाठी आवश्यक असणारी बैठक कुंभोजकरांकडे होती. पत्रकार आणि साहित्यिक हे समीकरण तसे वेगळे आहे. पत्रकार हा उत्तम साहित्यिक, लेखक होऊ शकतो; पण उत्तम लेखक हा उत्तम पत्रकार होऊ शकतोच असे नाही. कुंभोजकर यांनी मात्र पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला. बेळगावसारख्या सीमाभागात राहून त्यांनी मराठी भाषेची सेवा केली. बातम्या, संपादन यापाठोपाठ विशेष पुरवण्यांमध्येही कुंभोजकर रमले. `किर्लोस्कर’ मासिकात तब्बल २८ वर्षे त्यांनी काम केले. मुकुंदराव किर्लोस्कर यांच्यासारख्या दर्जेदार आणि साक्षेपी संपादकाच्या हाताखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनीही तिचे सोने केले.

सुरुवातीच्या काळात वि. स. खांडेकर यांचे `शिष्य’ म्हणून त्यांनी चार-पाच वर्षे काम केले. या अनुभवाचा खूप फायदा आपल्याला लेखन आणि पत्रकारितेमध्ये झाला, असे कुंभोजकर नेहमी सांगत. पत्रकारितेत प्रदीर्घ काळ काम करताना `वाचक’ हाच त्यांचा केंद्रबिंदू होता. पुरवण्यांचे संयोजन आणि संपादन करतानाही हाच दृष्टिकोन त्यांनी कायम ठेवला. शिवाय कामाची शिस्त आणि दर्जाबाबत कधीच तडजोड केली नाही. लेखक आणि संपादक असे दुहेरी यश पत्रकारितेत मिळविणे तसे सोपे नाही. रा. अ. कुंभोजकर यांचा समावेश अशा यशस्वी पत्रकारांमध्ये करावा लागेल. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेच्या बदलत्या काळाचा साक्षीदार आणि एक व्यासंगी संपादक, लेखक काळाच्या पडद्याआड गेला.