आर.एम. भट शाळेचा ‘शंभर नंबरी’ सोहळा

सामना ऑनलाईन । मुंबई

लालबाग-परळसारख्या कामगार विभागातील कित्येक पिढय़ांना ज्ञानदान करणारे गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एम. भट हायस्कूल येत्या 2 सप्टेंबरला शंभर वर्षे पूर्ण करीत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1917 साली सुरू झालेल्या या शाळेचा ‘शंभर नंबरी’ सोहळा शनिवार, 1 सप्टेंबरला शाळेच्या सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

आर. एम. भट शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघ’ स्थापन केला असून या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून शाळेत विविध उपक्रम राबविले जात आहेत. यंदा शाळेच्या शंभर वर्षानिमित्त सर्व माजी विद्यार्थी तसेच शाळेने मिळून एका विशेष सोहळय़ाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित राहणार असून हा सोहळा सायंकाळी 4 वाजता शाळेच्या सभागृहात पार पडणार आहे. जास्तीत जास्त आजी-माजी विद्यार्थी, पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी तसेच मुख्याध्यापिका जी. एस. कांबळे यांनी केले आहे.

परळ विभागातील संस्थांचाही गौरव
1 सप्टेंबरला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परळ विभागातील जुन्याजाणत्या संस्थांचादेखील आर. एम. भट शाळेच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचाही ‘आर. एम. भट रत्न’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

2 सप्टेंबरला भरणार माजी विद्यार्थ्यांची शाळा
2 सप्टेंबरला शाळेच्या 100 वर्षानिमित्त सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा सकाळी 10.30 वाजता शाळेची वाट धरणार आहेत. पहिली घंटा, प्रार्थना, आजी-माजी शिक्षकांनी साधलेला संवाद, मधली सुट्टी, चिंचा बोरं, बर्फाचा गोळा, सेल्फी विथ शाळा अशा पद्धतीने ही शाळा भरणार आहे. त्यासाठी gurudakshinamvs.org यावर किंवा स्वप्नील पिंगुळकर 9600830909, समीर फाटक
8652501118 यांना संपर्क साधावा.