महिलांवरील अत्याचार

प्रातिनिधिक फोटो

<<रा. ना. कुळकर्णी>>

एडीआर, अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या यादीत भाजप (जो स्वतःला धुतल्या तांदळासारखा स्वच्छ समजायचा) या पक्षाने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने लोकसभा, राज्यसभा तसेच विधानसभा अशा तीनही ठिकाणी चारित्र्यहीन उमेदवारांची वर्णी लावली आहे, अशांची संख्या चक्क ४५ आहे. काँग्रेस याही क्षेत्रात कमअस्सल ठरली आहे, हे झाले एतद्देशीय निःपक्ष मंचाचे मत. भाजपवर अपार श्रद्धा असणाऱ्या सामान्यजनांना याहूनही तीक्र स्वरूपाचा झटका आणखी एका सर्वेक्षणाने दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षा ख्रिस्तिना लेगार्ड यांनी देशातील महिलांच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष पुरवायला प्रत्यक्ष पंतप्रधान मोदींना सांगितले आहे. त्या म्हणाल्या, हिंदुस्थानात अलीकडे (अर्थात एनडीए शासन आल्यापासून) स्त्रीयांवरील अत्याचारांच्या दैनंदिन घटना अत्यंत घृणास्पद आहेत. त्यापुढे असेही म्हणाल्या, ‘पंतप्रधान मोदींनी याकडे जातीने लक्ष देऊन त्याविरोधात ठोस पावले उचलणे निकडीचे आहे. हेही नसे थोडके म्हणून की काय, त्यांनी अलीकडेच दाओसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेतही हेच विचार व्यक्त केले आहेत. भरीस भर म्हणून त्यांनी आपला मुद्दा पुढे रेटत मोदींच्या भाषणात महिलांचा पाहिजे तसा उल्लेख नसतो, असे खेदाने म्हटले आहे. एका पाश्चात्य महिलेने आम्हाला स्त्र्ााrविषयक वर्तनाचे प्राथमिक पाठ द्यावेत याहून अधिक अधोगती ती कोणती?

या देशाच्या चारित्र्यसंपन्नतेची भक्कम पायाभरणी व्यास, वाल्मीकी, आदी शंकराचार्य, स्वामी विवेकानंद आदी देवतांस्वरूप महामानवांनी करून ठेवली. पण कालांतराने आसुरी प्रवृत्ती वाढत गेली आणि ही इमारत खिळखिळी झाली. पाश्चात्यांच्या आक्रमणाने ती ढासळली.

एका स्त्र्ााrच्या शील रक्षणासाठी जिथे रामायण- महाभारत घडले त्याच भरतभूमीवर भोगप्रवृत्तीच्या पाश्चात्यांकडून आज आम्हाला नीतीच्या संथा घ्यायची वेळ यावी या परते दुसरे दुर्दैव ते कोणते! आमच्या ऋषीमुनींनी आम्हाला यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमन्ते तत्र देवतः हे शिकवले. पण आजच्या दानव प्रवृत्तीच्या विकृतांची मजल स्त्र्ााr ही फक्त उपभोग्य वस्तू आहे. कोणाही अबलेवर बलात्कार करून तिला मारून टाकणे किंवा जंगलात फेकून देणे इथपर्यंत पोहोचली आहे. कारण ना कायद्याचे भय ना कायदे करणाऱ्या राज्यकर्त्यांचे. पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये याबाबतीत एका शब्दानेही उल्लेख नसतो. आता सरकारने १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देणारा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींनीही अपराध्यांना फाशीची शिक्षा सुनवणाऱ्या विधेयकावर आपल्या पसंतीची मोहोर उठवली. शिवाय शीघ्रगती न्यायालयांकडे हे खटले सोपविले जातील. तरीही पंतप्रधानांनी याच्या प्रगतीकडे जातीने लक्ष पुरविले पाहिजे. नाहीतर आरंभशूर म्हणून आम्ही प्रसिद्ध आहोतच.