जगताप, अडसकर की पुन्हा देशमुख? माजलगावात उमेदवारीवरून भाजपमध्ये तगडी स्पर्धा

21
majalgaon-bjp-candidate-fight

उदय जोशी । बीड

माजलगाव विधानसभा मतदार संघाकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पक्षातले निष्ठावान आणि आताच दाखल झालेले असे प्रमुख दोन गट पडल्याची चर्चा आहे. भाजपचे विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांच्यासह मोहन जगताप, आणि रमेश अडसकर अशी तीन इच्छुकांची नावे सध्या चर्चेत आहेत. या तिघांनी ही लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी मोठा हातभार लावला आहे. मात्र तिघांच्या उमेदवारीच्या स्पर्धेत पक्ष कोणाच्या बाजूने उभा राहतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माजलगाव मतदार संघात या वेळी काटा लढत पाहण्यास मिळणार आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून माजी मंत्री प्रकाश सोळुंके निश्चित मानले जात आहे. त्यांना तगडी फाईट देण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश सोळुंके यांचा भाजपच्या आर.टी. देशमुख यांनी पराभव केला होता. त्यामुळे यंदा देखील आर.टी. देशमुखांना कायम ठेवणार की नुकतेच भाजपात दाखल होऊन लोकसभा खासदार प्रीतम मुंडे यांच्या विजयासाठी परिश्रम घेणारे मोहन जगताप यांना संधी मिळणार अशी चर्चा आहे. मोहन जगताप विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत, भाजपाची उमेदवारी आपल्यालाच आहे या आत्मविश्वासाने ते कामाला लागल्याचे सूत्रांकडून कळते आहे. मतदार संघातील गावागावामध्ये जाऊन त्यांनी गाठीभेटी वाढवल्या आहेत.त्यांच्या कामाचा धडाका पाहता मोहन जगताप निवडणूक लढवायची असाच संकेत देऊन जात आहेत. तर रमेश अडसकर हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. त्यांचा कारभार असणारा केज मतदार संघ राखीव असल्याने ते माजलगावमधून नशीब अजमावण्यासाठी इच्छुक असल्याचे कळते. दुसऱ्या बाजूला आर.टी. देशमुख निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसल्याचे चित्र रंगवले जात असले तरी यावर अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. एकंदरीत माजलगाव मतदार संघामध्ये भाजपाची उमेदवारी कोणाला द्यावी यावरून गोंधळाचे वातावरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या