परमेश्वराच्या घरात न्याय आहेच; ‘पार्थ’च्या पराभवावर विखेंचे सणसणीत विश्लेषण

132

सामना ऑनलाईन । नगर

‘दुर्दैवाने मावळमध्ये पार्थ पवारचा पराभव झाला. त्याच्याबद्दल मी काही भाष्य करणार नाही. पण परमेश्वराच्या घरामध्ये न्याय आहेच. जनतेच्या मनामध्ये असतं तेच होतं, तेच मला वाटतं त्यांची कितीही इच्छा असली तरी मतदानातून आणि सुजयच्या विजयातून त्यांना दिलेलं उत्तर आहे’, असं सणसणीत विश्लेषण माजी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

शरद पवार हे माझ्यासाठी अत्यंत आदरणीय व्यक्ती आहेत. त्याच्याबद्दल आजही आदर आहे. मात्र त्यांनी समजूतदारपणा दाखवून सुजयला संधी द्यायला हवी होती. पण त्यांनी तसे केले नाही. त्याचाच हा परिणाम असल्याचे विखे पाटील यांनी टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

नगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखेंनी विजयश्री खेचून आणली आहे. नगरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आपण शरद पवार यांना विखे यांनी आवाहन केले होते. मात्र, त्यावेळी ‘दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट कसा पुरवणार’ असे म्हणत पवारांनी सुजय यांच्यासाठी नगरची जागा सोडण्यास नकार दिला होता. मात्र प्रत्यक्षात नगरमध्ये सुजयचा विजय झाला, तर मावळमध्ये पवारांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यावेळी बोलताना “सुजयचा विजय” हेच पवारांना उत्तर असल्याची प्रतिक्रिया देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना टोला हाणला.

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेल्या नगर दक्षिण मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी विजय मिळवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या