रेडियो कॉलर हे चित्त्यांच्या मृत्यूचे कारण ? जाणून घ्या सरकार आणि तज्ज्ञांचे मत

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आतापर्यंत 5 चित्ते आणि त्यांच्या 3 बछड्यांचा मृत्यू झाला आहे. या आठवड्यात मंगळवार आणि शुक्रवारी अजून 2 चित्त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चित्त्यांच्या गळ्यात रेडियो कॉलर बांधलेल्या रेडियो कॉलरबाबत प्रश्न निर्माण होऊ लागला आहे; कारण दक्षिण आफ्रिकेतील एका चित्ता तज्ज्ञाने वृत्तसंस्थेशी बोलताना असा दावा केला आहे की, रेडियो कॉलरमुळे चित्ता सेप्टिसिमियाला बळी पडत आहेत, मात्र या तज्ज्ञाने केलेला हा दावा कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नसून तो फक्त अफवांवर आधारित असल्याने सरकारने फेटाळला आहे.

सेप्टिसीमिया हा एक गंभीर रक्त संसर्ग आहे. यामध्ये रक्तात विष तयार होऊ लागते. असे म्हटले जाते की, प्राण्यांच्या शरीरातील बाहेरील भागात जास्त काळ ओलावा राहिल्याने संसर्ग सुरू होतो. याचे रुपांतर सेप्टिसीमियामध्ये होते. दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी यावर असा दावा केला होता की, चित्त्यांच्या गळ्यात रेडियो कॉलर लावल्याने तेजस आणि सूरज चित्त्यांना सेप्टिसीमिया झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.

दक्षिण आफ्रिकेतील चित्ता मेटापोप्युलेशन तज्ज्ञ व्हिन्सेंट व्हॅन डर मर्वे यांनी मंगोलियातील एका वृत्तसंस्थेला सांगितले की, रेडियो कॉलर जास्त वेळ ओल्या स्थितीत राहिल्यामुळे चित्त्यांना त्याचा संसर्ग होतो. तेजस आणि सूरज या दोन्ही चित्त्यांचा सेप्टिसिमीयामुळे मृत्यू झाला आहे. चित्त्यांच्या गळ्यात इतर प्राण्यांनी जखमा केलेल्या नव्हत्या. सप्टेंबरनंतर त्यांना त्वचारोग आमि मायिसिसचे निदान झाले. त्यानंतर त्यांना सेप्टीसीमिया झाला होता.

केंद्र सरकारकडून निवेदन
केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, चित्त्यांना हिंदुस्थानात पाठवण्याबाबत एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 20 रेडियो कॉलर चित्ते हिंदुस्थानात आणण्यात आले. त्यांच्या कॉरंटाईन कालावधीनंतर सर्व चित्त्यांना एका अनुकूल ठिकाणी हलवण्यात आले. सध्या 11 चित्ते मुक्त स्थितीत आहेत आणि हिंदुस्थानात जन्मलेल्या एका पिल्लासह 5 चित्ते क्वारंटाईन स्थितीत ठेवण्यात आले आहे. प्रत्येक चित्त्याची चोवीस तास देखरेख करण्यात येत आहे. चित्त्यांच्या मृत्यूचे कारण तपासण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातील आंतरराष्ट्रीय चित्ता तज्ञ/पशुवैद्यकांचा सल्ला नियमितपणे घेत आहेत.
सरकारने हाती घेतलेला उपक्रम पूर्ण होण्यासाठी एक वर्ष पूर्ण व्हायचे आहे शिवाय चित्त्यांना हिंदुस्थानात आणणे, हा दीर्घकालिन प्रकल्प आहे. आफ्रिकी देशांमध्ये चित्त्यांचा मृत्यूदर 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. चित्त्यांचे मृत्यू हे आपसातील भांडण, आजार, त्यांची सुटका केल्यानंतर होणारे अपघात, प्राण्यांची शिकार करताना झालेल्या दुखापती, विषबाधा इत्यादी कारणांमुळे होऊ शकतात. गेल्या 10 महिन्यांत या प्रकल्पांतर्गत सहभागी असलेल्यांनी चित्ता व्यवस्थापन, देखरेख आणि संवर्धनाबाबत मौल्यवान माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प दीर्घकाळात यशस्वी होईल, याविषयी सरकार आशावादी आहे.