संघर्षपूर्ण लढतीत नदालचा घामटा काढला


सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररच्या धक्कादायक पराभवानंतर अमेरिका ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत टेनिसशौकिनांना बुधवारीही संघर्षपूर्ण लढतीची मेजवानी मिळाली. अव्वल मानांकित स्पेनच्या राफेल नदालचा उपांत्यपूर्व लढतीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने चांगलाच घामटा काढला. दुसरीकडे अर्जेंटिनाच्या युआन मार्टिन डेल पोत्रोनेही संघर्षपूर्ण विजयानंतर उपांत्य फेरी गाठली.

राफेल नदाल आणि नवव्या मानांकित डॉमिनीक थिम यांच्यातील मॅरेथॉन लढत तब्बल 4 तास 48 मिनिटांपर्यंत रंगली. अखेरच्या क्षणापर्यंत दोलायमान हिंदोळय़ावर असलेल्या या सामन्यात नदालने 0-6, 6-4, 7-5, 6-7 (4/7), 7-6(7/5) अशी बाजी मारत उपांत्य फेरीत धडक दिली. जुआन मार्टिन डेल पोत्रोलाही अमेरिकेच्या जॉन इस्नरने विजयासाठी 3 तास 31 मिनिटांपर्यंत झुंजविले. डेल पोत्रोने 6-7 (5/7), 6-3, 7-6 (7/4), 6-2 असा विजय मिळवून तिसऱ्यांदा अमेरिका ओपनची उपांत्य फेरी गाठली.

अमेरिका ओपनमध्ये 14 वर्षांत राफेल नदालने प्रथमच पहिला सेट एकही गेम न जिंकता गमावला.

तीन वर्षांपूर्वी 2015 च्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्येही राफेल नदालविरुद्ध टॉमस बर्डिचने 6-0 फरकाने सेट जिंकला होता.

त्याआधी 2006 च्या विम्बल्डनमध्ये आणि 2004 च्या अमेरिका ओपनमध्ये ऍण्डी रॉडिकने नदालविरुद्ध 6-0 फरकाने सेट जिंकला होता.

सेरेना, अनास्तासिया उपांत्य फेरीत
महिला गटात यजमान अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि लॅटविया देशाची अनास्तासिया सेक्हास्तोक्हा यांनी अमेरिका ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 17 व्या मानांकित सेरेनाने 1 तास 26 मिनिटांत आठव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोक्हाचा 6-4, 6-3 असा पराभक केला.