पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींचे दलाल, राहुल गांधींचा घणाघाती आरोप

29

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राफेलचे कंत्राट अनिल अंबानी यांना मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाली केली असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राफेल विमाने फ्रान्सकडून खरेदी करण्यात आली आहे. या विमान खरेदीची घोषणा करण्याच्या 15 दिवस आधी अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतल्याचे वृत्त आज वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताचा आधार घेत राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला आहे की सौद्याची घोषणा करण्यापूर्वी अनिल अंबानी हे फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना या सौद्याबाबत कसे काय भेटू शकले,त्यांना सौद्याबाबतची माहिती कशी मिळाली ? सौद्याबाबतची माहिती अनिल अंबानी यांना देत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गोपनीयतेचा भंग केला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी यांच्यावर गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला पाहीजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

इंडीयन एक्सप्रेस या इंग्रजी वर्तमानपत्राने अनिल अंबानी आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या वृत्तात म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करण्यापूर्वी १५ दिवस आधी उद्योगपती अनिल अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अंबानी यांनी फ्रान्सचे संरक्षणमंत्री जाँ-येवेस ली ड्रायन यांचीही भेट घेतली होती. ही भेट गोपनीय होती आणि तातडीने बोलावण्यात आली होती अशी माहिती फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांचे उद्योग सल्लागार ख्रिस्तोफ सालोमन यांनी एका युरोपीय संरक्षण कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला दिली होती असं या बातमीत म्हटलं आहे.

फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अनिल अंबानी यांनी त्यांच्या कंपनीला एअरबस सोबत व्यावसायिक आणि संरक्षण या दोन्ही प्रकारातील हेलिकॉप्टरसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबतचा एक करार होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा फ्रान्स दौऱ्यावर येतील तेव्हा या करावावर सह्या केल्या जातील अशी शक्यता या बैठकीत वर्तवण्यात आली होती. या बैठकीदरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एप्रिल महिन्यातील फ्रान्स दौरा निश्चित झाल्याचे कळाले होते. जे प्रतिनिधी मंडळ या दौऱ्यावर फ्रान्सला आले होते त्यामध्ये अनिल अंबानी यांचाही समावेश होता.

ज्या आठवड्यामध्ये फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्याची आणि अनिल अंबानी यांची भेट झाली होती त्याच आठवडय़ात ‘रिलायन्स डिफेन्स’चा समावेश या व्यवहारात करण्यात आला होता. हा सौदा 58 हजार कोटींचा असून अनिल अंबानी यांच्या कंपनीला 30 हजार कोटी मिळाल्याचा दावा केला जात आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलाली केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या