रॅगिंगमुळे विद्यार्थ्याची किडनी फेल

सामना ऑनलाईन । कोट्टयम

केरळमधील कोट्टयम येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयात (पॉलिटेक्निक कॉलेज) रॅगिंगमुळे एका विद्यार्थ्याचे मूत्रपिंड निकामी (किडनी फेल) झाले आहे. विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाने सात विद्यार्थ्यांचे निलंबन केले आहे. निलंबित केलेल्यांपैकी सहा विद्यार्थी पोलिसांना शरण आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फरार विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे.

तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्गातील सात विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गात शिकणाऱ्या आठ विद्यार्थ्यांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. विद्यार्थ्यांना कपडे उतरवून सहा सात तास व्यायाम करायला लावणे, रसायन टाकलेले मद्य जबरदस्तीने प्यायला लावणे, व्यायामामधील कठीण असलेल्या कसरती विद्यार्थ्याना करायला लावणे, विद्यार्थ्यानी नकार देताच त्यांना सिगारेटचे चटके देणे. यासारखे अघोरी प्रकार ते विद्यार्थ्यांसोबत करत होते. तसेच या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी त्यांनी विद्यार्थ्याना दिली होती. रोजच्या या अत्याचारामुळे यातील एका विद्यार्थ्याची तब्येत रविवारी अचानक बिघडली. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्याचे मूत्रपिंड झाल्याचे समोर आले. मुलाचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे समजताच त्याच्या पालकांना धक्का बसला. आपल्या मुलाला कधीही मूत्रपिंडाशी संबंधित त्रास नव्हता असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या मित्रांना बोलते केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रॅगिग करणा-या विद्यार्थ्याविरोधात पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या घटनेची माहीती मिळताच कॉलेज प्रशासनने सातही विद्यार्थ्याना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले . दरम्यान या घटनेची दखल मानवधिकार आयोगाने घेतली असून याप्रकरणाशी संबंधित अहवाल मागवला आहे.