मोदी सरकारच्या धोरणांमुळे बँकांची अवस्था नाजूक होईल : रघुराम राजन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘मुद्रा योजने’वर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी टीका केली आहे. मुद्रा योजनेमुळे बँकांचा एनपीए वाढेल. त्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती नाजूक होईल, असे राजन यांनी टीकेचे बाण सोडत सरकारवर हल्ला केला. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून राजन यांनी पूर्वीच्या यूपीए आणि आता मोदी सरकारच्या धोरणांवर विविध मुद्द्यांवर टीका केली आहे.

बँकांच्या थकीत कर्जात (एनपीए) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बँका डबघाईला आल्या आहेत. यावर लोकसभेच्या संसदीय समितीने रघुराम राजन यांना उपस्थित राहून भूमिका मांडावी असे सांगितले होते. त्यानंतर पत्राद्वारे भूमिका मांडण्यास परवानगी दिली. त्यानुसार राजन यांनी संसदीय समितीने दीर्घ पत्र पाठवून बँकांची स्थिती सखोलपणे मांडली आहे. रोज या पत्रातील एक अंश प्रसिद्ध होत आहे.

रघुराम बाण

  • तीन दिवसांपूर्वी राजन यांनी बँकांच्या वाढलेल्या ‘एनपीए’ला तत्कालीन ‘यूपीए’ सरकार जबाबदार असल्याचे म्हटले होते.
  • मी गव्हर्नर असताना बँकांमधील घोटाळ्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले होते, मात्र काहीच कारवाई केली गेली नाही असे राजन यांनी संसदीय समितीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. हे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले.
  • आज या पत्रातील आणखी एक नवा मुद्दा पुढे आला आहे. मुद्रा कर्ज योजना, किसान क्रेडिटसारख्या योजनांमुळे ‘एनपीए’मध्ये वाढ होऊन बँकांची स्थिती आणखी बिघडेल, असे राजन यांनी या पत्रात म्हटले आहे.